ग्राहकांनी आर्थिक फसवणुकीपासून सावध राहणे महत्त्वाचे – साजीद मुलाणी

सांगली (प्रतिनिधी)
ग्राहकांनी आर्थिक फसवणुकीपासून सावध रहावे. कोणत्याही अमिषाला बळी पडू नये. आपल्या खात्यांची गोपनीयता ठेवावी. कोणालाही पासवर्ड सांगू नये तसेच बनावट लिंक उघडू नये असे आवाहन साजीद मुलाणी यांनी केले. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने बस्तवडे तालुका ‘तासगाव’ येथे ग्रामस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
बँकेचे अध्यक्ष मानसिंग नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी वाघ यांच्या संकल्पनेतून प्रत्येक गावामध्ये अशा ग्रामस्तरीय मेळाव्याचे आयोजन करून शेतकरी व नागरिकांना विविध शासकीय व बँकिंग योजना व सुविधांची माहिती पुरवली जात आहे. यावेळी मुख्य कार्यालयाकडील साजीद मुलाणी यांनी उपस्थित ग्राहकांना मार्गदर्शन केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, शेतकऱ्यांनी फक्त शेतीपुरते मर्यादित न राहता इतर शेतीपूरक व्यवसायास प्राधान्य द्यावे. दुभती जनावरे, कुक्कुटपालन,पालन पालन प्रकल्प, ट्रॅक्टर व शेतऔजारे खरेदी, लहान व मोठ्या व्यवसायासाठी बँकेच्या माध्यमातून कर्जपुरवठा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. शेती हा केवळ उत्पन्नासाठी मर्यादित व्यवसाय नसून त्यासोबत जोडलेले विविध उपक्रम व व्यवसाय शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. विविध विकास महामंडळे, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, एनएलएम, पीएमएफएमई अशा विविध योजनेंतर्गत व्याज परतावा, अनुदान तसेच अन्य मदतीच्या सुविधा उपलब्ध असून, त्या योजना योग्य पद्धतीने वापरल्यास शेतकरी त्याच्या उत्पन्नात वाढ करू शकतो. शासनाच्या व बँकेच्या उपलब्ध सुविधा शेतकऱ्यांनी नक्कीच वापरून आपला व आपल्या कुटुंबाचा आर्थिक स्थैर्य साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष दिनकर आबा पाटील यांचे हस्ते नवीन एटीएम कार्ड, पासबुक वितरण केले. कार्यक्रमाला मुख्य कार्यालयाकडील साजीद मुलाणी, फिल्ड ऑफिसर रमेश पाटील, एफएलसीचे अधिकारी दीपक क्षीरसागर, सोसायटीचे अध्यक्ष, शेतकरी व महिला उपस्थित होत्या.