मिरजेत ३३ वर्षानंतर शिवाजी विद्यापीठ युवा महोत्सव- प्राचार्य डॉ. अनिल पाटील

साळुंखे महाविद्यालयात तीन दिवस होणार तरुणाईचा जल्लोष
मिरज (प्रतिनिधी)
येथील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाचा ४५ वा मध्यवर्ती युवा महोत्सव १८ ते २० दरम्यान उत्साहात पार पडणार आहे. महोत्सवात तीन दिवसांत ३६ प्रकारच्या स्पर्धा पार पडणार आहेत, अशी माहिती प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, “या महाविद्यालयाची स्थापना १९६५ मध्ये झाली असून यंदाचे हे हीरक महोत्सवी वर्ष आहे. ३३ वर्षांनंतर महाविद्यालयास मध्यवर्ती युवा महोत्सवाचा पुन्हा हा मान मिळत आहे. याआधी १९९२ मध्ये येथे युवा महोत्सवाचे आयोजन झाले होते. या आयोजनामुळे मिरजेच्या सांस्कृतिक परंपरेला नवे पर्व लाभणार आहे. या महोत्सवात सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील २०० हून अधिक महाविद्यालयांतून सुमारे २ हजार २०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ३६ कलाप्रकारांत लोकसंगीत, नृत्य, नाट्य, वक्तृत्व, चित्रकला, छायाचित्रण, हस्तकला, वाद्यवृंद, लघुपट, सुगम व शास्त्रीय संगीत अशा विविध स्पर्धा घेण्यात येतील. शहरातील लक्ष्मी मार्केट, बालगंधर्व नाट्यगृह यांसह महाविद्यालयाचे प्रांगण या स्पर्धांचे साक्षीदार ठरणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी (ता. १८) सकाळी १० वाजता होणार आहे. मिरज आमदार सुरेश खाडे हे उद्घाटक असून, प्रमुख पाहुणे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील, तर अध्यक्ष म्हणून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे उपस्थित राहणार आहेत. शनिवार (ता. २०) सकाळी ११.३० वाजता समारोप समारंभ व पारितोषिक वितरण होईल. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के प्रमुख पाहुणे, तर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे अध्यक्षस्थानी असणार आहेत. महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभाग व शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून समन्वयक प्रा. डॉ. अर्जुन जाधव आहेत. विद्यार्थ्यांनी व रसिक प्रेक्षकांनी या कलासोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी केले आहे.