मिरज लोक न्यायालयात सव्वादोन हजार प्रकरणे निकाली ; सुमारे सव्वा कोटी रक्कम वसूल

मिरज प्रतिनिधी
शनिवार दि.१३ रोजी मिरज न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोकअदालती मध्ये २२१ प्रलंबित दिवाणी व फौजदारी तडजोड पात्र प्रकरणे तसेच २ हजार ४२ दावापूर्व प्रकरणे निकाली करण्यात आली. यामधून एकूण एक कोटी १७ लाख ३९ हजार ८८३ इतकी रक्कम वसूल करण्यात आली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगलीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांच्या मार्गदर्शनाखाली विधी सेवा समिती मिरजचे अध्यक्ष ए. एस. राणे यांनी लोकदालतीचे नियोजन केले. या लोक अदालतीमध्ये विधिज्ञ व पक्षकारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या लोक अदलतीमध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्याखाली दाखल केलेल्या प्रलंबित फौजदारी प्रकरणामधील दीड वर्षांपासून विभक्त राहत असलेल्या पती-पत्नीमध्ये सामोपचाराने तडजोड घडवून आणून एक दुभंगलेला संसारही पुन्हा जुळला गेला. या लोकअदालतीमध्ये न्यायाधीश पी. यू. कुलकर्णी यांनी पॅनेल प्रमुख म्हणून तर पॅनेल सदस्य म्हणून ॲड. तौफिक पीरखान यांनी काम पाहिले.