जीएसटी दर कपातीमुळे औद्योगिक क्षेत्राबरोबरच सर्वसामान्यांना होणार लाभ – रोहित जोशी

रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅली तर्फे चर्चासत्र संपन्न ; जीएसटी योगदान देणाऱ्या करदात्यांचा गौरव
सांगली (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)
जीएसटी परिषदेतील निर्णयानुसार २२ सप्टेंबर पासून मोठ्या प्रमाणावर जीएसटी दर कपात होत असून १२% तील अनेक वस्तू ५ टक्के तर २८ मधील बहुतांशी वस्तू २८% या कर दरात येत असल्यामुळे औद्योगिक क्षेत्राबरोबर सर्वसामान्यांना मोठा लाभ होणार आहे असे प्रतिपादन केंद्रीय जीएसटी कोल्हापूर आयुक्तालयाचे सहआयुक्त रोहित जोशी यांनी केले. ते रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅली तर्फे आयोजित विशेष चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळेस खासदार विशाल पाटील हे अध्यक्षस्थानी होते. तर ज्येष्ठ उद्योजक दीपक शिंदे, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते एड. विद्याधर आपटे, राज्य जीएसटी अन्वेषण विभाग पुणेचे उपायुक्त सुनील कानगुडे, केंद्रीय जीएसटी सांगली विभागाचे सहायक आयुक्त यु. के. सतीश हे प्रमुख उपस्थित होते. रोटरी क्लबचे अध्यक्ष उदय कुलकर्णी, प्रमोद चौगुले, राजेंद्र मेढेकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
रोहित जोशी यांनी यावेळी बोलताना वेगवेगळ्या क्षेत्रांना मिळालेल्या कर दर कपातील सवलतींचे तपशीलवार विवेचन केले. सांगलीतील साखर व अन्नप्रक्रिया क्षेत्राला विशेष लाभ होणार असल्याचे आवर्जून नमूद केले. तसेच करदात्यांनी आपल्या कोणत्याही जीएसटी विशेष अडचणसाठी स्थानिक केंद्रीय जीएसटी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना खासदार विशाल पाटील यांनी सर्वसामान्य जनतेला या सवलतींचा लाभ होईल असे प्रतिपादन करून सरकारने हा लाभ शेवटपर्यंत पोहोचेल यासाठी योग्य अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे नमूद केले. काही प्रक्रियात्मक अडचणी यांचे समाधान केल्यास हा कर अधिक सोपा व सुलभ होईल असे प्रतिपादन केले.
ज्येष्ठ उद्योजक दीपक शिंदे यांनी सरकारच्या जीएसटी दर कपातीच्या या मोठ्या पावलामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबुती करण्यासाठी मोठा आधार मिळणार असून मिशन 2047 साठी याचा मोठा उपयोग होणार आहे असे सांगितले. मुख्य वक्ते एड. विद्याधर आपटे यांनी नवीन बदलांची तपशीलवार व विस्तृत माहिती उपस्थित त्यांना देऊन त्यांच्या शंकांचे समाधान केले. कार्यक्रमाचे स्वागत विनायक काळे यांनी तर प्रास्ताविक उदय कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र मेढेकर यांनी व संयोजन स्वप्नील पाटील यांनी केले. आभार प्रमोद चौगुले यांनी मानले.
जिल्ह्यात जीएसटी मध्ये मोठे योगदान देणारे करदाते महाबळ मेटल्स प्रा.ली, मिरज , कस्तुरी फाउंड्री आष्टा, सह्याद्री स्टार्च मिरज, राजारामबापू सहकारी साखर कारखाना (साखराळे), पुरुषोत्तम नारायण गाडगीळ (सांगली), बी. जी. चितळे/चितळे फुड्स (भिलवडी), सोनाई इन्फ्रा, सुयेश कास्टिंग, आष्टा लायनर्स, गोदरेज ॲग्रीवेट, सह्याद्री मोटर्स आदींचा सन्मान यावेळी करण्यात आला. याप्रसंगी उद्योजक पीएनजीचे राजीव गाडगीळ, ज्येष्ठ कर सल्लागार ॲड. किशोर लुल्ला, मोहनराव शिंदे कारखान्याचे एम.डी. देवराव लोकरे, राजारामबापू साखर कारखान्याचे चीफ अकाउंटंट संतोष खटावकर, ज्येष्ठ उद्योजक उज्वल साठे, विनोद पाटील, शांतिनाथ पाटील, संजीव पाटील यांचे सह मोठ्या संख्येने करदाते कर सल्लागार उपस्थित होते.