देशी झाडांसाठी सांगलीत पर्यावरणप्रेमींचा लोकशाही मार्गाने लढा सुरूच; मनपात झाडे स्वीकारायला नकार

0
IMG-20250923-WA0328

सांगली (प्रतिनिधी)
आपल्या शहरात देशी झाडेच लावली पाहिजेत” या मागणीसाठी नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत. महापालिकेच्या कोणत्याही कामकाजात अडथळा न आणता, दररोज एक देशी झाड आयुक्तांना भेट देऊन ते देशी वृक्षलागवडीचे महत्त्व पटवून देत आहेत. मात्र, या झाडांचा स्वीकार करण्यासही आयुक्त कार्यालयातील कर्मचारी तयार नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

आम्ही झाड भेट देण्यासाठी त्यांच्या कार्यालयीन वेळेत जातो, कोणालाही त्रास न देता आंदोलन करतो, तरीसुद्धा हे झाड स्वीकारले जात नाही. हे केवळ आमच्या आंदोलनाचा अवमान नाही तर देशी झाडांच्या महत्वाचाही अपमान आहे, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. कार्यकर्त्यांनी विदेशी झाडांचे दुष्परिणाम, त्यांना लागणारे अधिक पाणी, स्थानिक जैवविविधतेला होणारी हानी याबाबत वारंवार समजावून सांगितले. तरीही महापालिका विदेशी झाडे लावण्याच्या हट्टावर ठाम असल्याचा आरोप करण्यात आला.

आमची लढाई ही पर्यावरणासाठी आहे, व्यक्तीविरुद्ध नाही. झाड भेट आंदोलन हा आमच्या भावना व्यक्त करण्याचा लोकशाही मार्ग आहे. देशी झाडांमुळेच आपल्या शहराची हवा, पाणी आणि जैवविविधता सुरक्षित राहील. आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर हा लढा अजून व्यापक होईल, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला. दरम्यान, सांगलीसह इतर जिल्ह्यांतील पर्यावरणप्रेमी या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठींबा देत आहेत. लवकरच विविध भागांतून कार्यकर्ते सांगलीत येऊन आयुक्तांना देशी झाड भेट देणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *