मिरजेतील श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाचे उदघाटन उत्साहात

आ .डॉ.सुरेश भाऊ खाडे, समित दादा कदम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
मिरज (प्रतिनिधी)
मिरजेतील श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाचे उदघाटन सोमवार (दि.२२) रोजी आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली व सुप्रसिद्ध गायिका विदुषी कलापिनी कोमकली यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी जनसुराज्य शक्ती पार्टीचे प्रदेश अध्यक्ष समितदादा कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माजी महापौर सौ. संगीता खोत, नवरात्र संगीत महोत्सव समितीचे अध्यक्ष मधुभाऊ पाटील, उपाध्यक्ष डॉ. शेखर करमरकर, सचिव विनायक गुरव, खजिनदार संभाजी भोसले, प्रशांत गुरव, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, माजी नगरसेवक निरंजन आवटी, बाळासाहेब मिरजकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
महोत्सवाचे हे ७१ वे वर्ष असून दिनांक बुधवार दिनांक २ ऑकटोबर पर्यंत संगीत महोत्सव साजरा होणार आहे. प्रतिवर्षीप्रमाणे अनेक दिग्गज कलाकार यामध्ये सेवा बजावणार आहेत. श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव मंडळा तर्फे गेल्या ७० दशकाहून अधिक काळ संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते व या संगीत सभेस अनेक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दिग्गज कलाकार आपली सेवा अंबामातेच्या चरणी अर्पण करण्यासाठी श्रद्धेने हजेरी लावत असतात. यंदाचे संगीत महोत्सवाचे ७१ वे वर्ष आहे. या वर्षीही अनेक दिग्गज कलाकार आपली संगीत सेवा सादर करणार आहेत.
सर्वप्रथम दीपप्रज्वलन करून उदघाटन सोहळ्याची सुरवात करण्यात आली. प्रास्ताविक मंडळाचे खजिनदार संभाजी भोसले यांनी केले तर स्वागत मंडळाचे अध्यक्ष मधुभाऊ पाटील यांनी केले. पाहुण्यांची ओळख श्रीकांत येडूरकर यांनी करून दिली. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांचा मंडळाच्यावतीनेअध्यक्ष मधुभाऊ पाटील यांनी बुके, मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार केला, तर समित दादा कदम यांचा सत्कार मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. शेखर करमरकर यांच्या हस्ते करण्यात आला. आ. सुरेशभाऊ खाडे यांचे हस्ते विदुषी कलापिनी कोमकली यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर मा.आ. सुरेशभाऊ खाडे यांनी ७१ व्या श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाचे उदघाटन झाल्याचे जाहीर केले.
आ. सुरेश खाडे म्हणाले, श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाशी गेली १७ वर्षे नाते जोडले गेले असून मी आता या मंडळाचाच एक घटक बनलो आहे. देवीच्या कृपेने मिरजेतून चार वेळा आमदार म्हणून निवडून आलो व देवीच्याच कृपेने पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या ठिकाणी देवीच्या चरणी सादर होत असलेल्या नवरात्र संगीत महोत्सवासाठी हातभार लावण्यास मिळणे हे माझे भाग्यच आहे. प्रतिवर्षी संगीत महोत्सवाला शासकीय निधी देण्याचा मी प्रयत्न केला आहे व निधी मिळवून दिला आहे. यावर्षीही हा निधी निश्चितच मंडळाला प्राप्त होईल. मंडळाला निधीची कमतरता पडणार नाही याची हमी आ. खाडे यांनी दिली.
श्री अंबामातेच्या कृपेने व सर्व मिरजकरांच्या प्रेमामुळे येथील श्री अंबाबाई मंदिराचा कायापालट करण्याचे काम आता हाती घेतले असून तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी यासाठी देण्यात आला आहे. त्याचे काम सुरु असून लवकरच याठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील अतिशय देखणे व आकर्षक असे दगडी बांधकाम असलेले श्री अंबाबाईचे मंदिर उभे राहिलेले दिसेल असे ते म्हणाले. आ. खाडे यांनी नवरात्रीच्या निमित्त सर्व भाविकांना, जनतेला यावेळी शुभेच्छा दिल्या.
जनसुराज्य शक्ती पार्टीचे प्रदेश अध्यक्ष समित दादा कदम यांनी अगदी बालपणापासून या मंदिरात येत असल्याचे व नवरात्र संगीत महोत्सवाशी अनेक वर्षे निगडित असल्याचे सांगितले. या महोत्सवासाठी तसेच मंदिराच्या कोणत्याही कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रमुख अतिथी विदुषी कलापिनी कोमकली यांनी मिरजेच्या संगीत परंपरेचा वारसा मंडळ चांगल्या प्रकारे जपत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले . तसेच या निमित्ताने अंबामातेची सेवा करण्याचे भाग्य मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आभार प्रदर्शन मंडळाचे सचिव विनायक गुरव यांनी केले. उदघाटन समारंभानंतर विदुषी कलापिनी कोमकली यांच्या शास्त्रीय संगीताचा लाभ मिरजकर रसिकांना मिळाला.