मिरजेत चालुक्य एक्सप्रेसमध्ये पाचशेच्या नोटांचा बेवारस बॉक्स सापडल्याने खळबळ

मिरज (प्रतिनिधी)
हुबळीहुन दादरला जाणाऱ्या चालुक्य एक्सप्रेसमध्ये पाचशेच्या नोटांनी भरलेला एक बेवारस बॉक्स सापडल्याने मिरज रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली. मात्र रेल्वे सुरक्षा दल व पोलिसांनी चौकशी केली असता या नोटा खेळण्यातल्या असल्याचे स्पष्ट झाले.
अधिक माहिती अशी कि, चालुक्य एक्सप्रेसच्या आरक्षित बोगीत प्रवाशांना एक संशयास्पद बॉक्स दिसला. गाडी मिरजेत आल्यानंतर काही प्रवाशांनी तो बॉक्स उघडला असता त्यात पाचशे रुपयांच्या नोटांची बंडले असल्याचे आढळले. ही बाब लक्षात येताच रेल्वे स्थानकावर गोंधळ उडाला. दरम्यान, स्थानक परिसरात फिरणाऱ्या काही तरुणांनी हा बॉक्स उचलून पळ काढला. पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाने तत्काळ शोधमोहीम राबवली असता रेल्वे कर्मचारी वसाहतीलगत हा बॉक्स व त्यातील नोटा टाकून दिलेल्या अवस्थेत आढळून आल्या. तपासात या नोटा खऱ्या नसून खेळण्यातल्या असल्याचे निष्पन्न झाले.
सदर बॉक्स कोणीतरी गाडीत विसरून गेला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र या घटनेमुळे “चालुक्य एक्सप्रेसमध्ये कोट्यवधी रुपयांचा पैसा सापडला” अशी अफवा पसरली होती. शेवटी पोलिसांनी या खेळण्यातल्या नोटांचा बॉक्स बेवारस सामान म्हणून मिरज रेल्वे स्थानक अधीक्षकांकडे जमा केला आहे.