कुंभी कासारी साखर कारखान्याची वार्षिक सभा खेळीमिळीत

कोपार्डे.(प्रतिनिधी) कुंभी कासारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत कर्जावर जोरदार चर्चा सुरू होती. दोन्ही बाजूंनी कारखान्यावर असलेल्या कर्जाबद्दल आरोप प्रत्यारोप होत असताना अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी गेल्या १५ वर्षाचा एफआरपी व साखरेच्या दराचा अहवाल मांडला. यावेळी विष्णू पाटील या सभासदाने सहकारी साखर कारखान्यावर एफआरपी देण्यासाठी झालेली कर्जे माफ करावी असा ठराव मांडला आणि याला सर्वच सभासदांच्या एकमताने मंजूर करण्यात आला.
कारखान्याच्या कार्यस्थळावर आमदार चंद्रदीप नरके यांच्या अध्यक्षतेखाली ६४वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी उपाध्यक्ष राहुल खाडे यांची प्रमुख उपस्थित होती. आमदार चंद्रदीप नरके यांनी कारखान्याचा ताळेबंद अहवाल सभसदांच्या समोर मांडताना एफआरपी वाढली पण साखरेचे दर वाढले नाहीत. यामुळे दरवर्षी कारखान्याला तोटा होत गेला आहे असे सांगितले. यावेळी बाळासाहेब खाडे व अमर पाटील यांनी पुनर्मुल्याकन करून ४७० कोटी जिंदगी वाढवली. यातील ३४५ कोटी घेतले १२५ कुठे गेले असा प्रश्न केला.ताळेबंद कुठेच जुळत नाही असे सांगितले. यावेळी अध्यक्ष नरके म्हणाले एफआरपी देताना १५ वर्षात २५० कोटींची कर्जे वाढली आहेत. याला केंद्रशासनाचे चुकीचे धोरण कारणीभूत आहे. जगातील साखर उद्योग एकमेव असा उद्योग आहे ज्याच्या पक्य्या मालाचा दर नंतर आणि एफआरपी अगोदर ठरते. कर्जापैकी ४४ कोटी मालतारण तर २२४ कोटी मध्यम मुदत कर्जे आहेत. संस्था तोट्यात आली तरी शेतकऱ्यांचा एफआरपीचा एकही रुपया थकवला नाही. यावेळी भोगावती बिद्री राजाराम साखर कारखान्याच्या अहवालाची तुलनात्मक चर्चाही रंगली.
संजय पाटील वाकरे यांनी कारखान्याचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे का? विस्तारीकरण केले पण ऊस उपलब्धता कोठून करणार असे विचारले असता. अध्यक्ष नरके म्हणाले कुंबीच्या कार्यक्षेत्रात २७ हजार ५७२ हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. पण गाळत क्षमता कमी असल्याने शेतकरी दुसऱ्या कारखान्याला ऊस पाठवत आहेत. कुंभी कासारी बद्दल विश्वासहर्ता असल्याने विस्तारीकरण झाल्यास हा ऊस सहज उपलब्ध होणार आहे असे सांगितले. राजू सूर्यवंशी,बाजीराव देवाळकर,बी. आर.पाटील,विष्णू राऊत,एकनाथ पाटील, प्रताप पाटील यांनी सुचना केल्या