आ. सुरेश खाडे यांची मुख्यमंत्री निधीला १० लाखांची मदत

मिरज (प्रतिनिधी)
मराठवाड्यासह मध्य व पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे महाभयंकर अशी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सदर पूरस्थितीची दृश्ये पाहता व तेथील नागरिक, शेतकरी, महिला, लहान मुले यांच्यावर ओढवलेली भयावह परिस्थिती पाहता सांगलीचे माजी पालकमंत्री व माजी कामगार मंत्री आ. डॉ. सुरेश खाडे यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून रुपये १० लाखाचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंबई येथे सुपूर्द केला.
मिरज विधानसभा क्षेत्रातून या पूरग्रस्त जिल्ह्यासाठी धान्य, कपडे, औषधे व जनावरांसाठी चारा पाठविण्याची तातडीने व्यवस्था करणार असल्याचे आ. डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले. सांगली, मिरज विधानसभा क्षेत्रातील विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, संघटना व नागरिकांनी या पूरग्रस्तांना सढळ हाताने मदत करण्यास पुढे यावे, असे आवाहन आ. डॉ. खाडे यांनी केले. यासाठी मिरजेतील आ. डॉ. खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
याबाबत माहिती दिली की, अनेक कुटुंबे या पुरामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. शेकडो जनावरे पाण्यात वाहून गेली. हजारो घरे पाण्याखाली आहेत. शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. अहिल्यानगर, सोलापूर, नाशिक, सातारा, धुळे, नंदुरबार, जळगाव, परभणी, लातूर, धाराशीव, बीड, जालना यासह आसपासच्या जिल्ह्यात ११० गावात पावसाने थैमान घातल्याने येथील जनजीवन ठप्प झाले आहे. या महापुरात आतापर्यंत ८ जणांचा बळी गेला आहे. या सर्व भागात शासनाने तातडीने मदत कार्य सुरु केले असून लष्कराचे पथकही मदतीसाठी बोलवले आहे.