महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक – आरती कांबळे

साळुंखे महाविद्यालयात ‘महिलांचे आरोग्य आणि स्वच्छता ‘ या विषयावर कार्यशाळा उत्साहात
मिरज (प्रतिनिधी)
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयातील ‘महिला सक्षमीकरण कक्षा’मार्फत महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी ‘महिलांचे आरोग्य आणि स्वच्छता’ या विषयावर पी. ॲंड जी’ज सेलेना कंपनी, पुणे यांच्या सहयोगाने एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या पी. ॲंड जी’ज सेलेना कंपनीमध्ये कार्यरत असणाऱ्या श्रीमती आरती कांबळे, सांगली या होत्या. त्यांच्या सहकारी श्रीमती सिमरन कांबळे याही कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. अनिल पाटील होते.
आरती कांबळे म्हणाल्या, ‘महिलांनी आपल्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे, स्वतःची काळजी घेतली पाहिजे. बऱ्याचदा महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. तसे न करता आरोग्यविषयक काही समस्या असतील तर वेळीच वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे.’ पुढे त्यांनी सेलेना कंपनीच्या महिलांसाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या आरोग्यविषयक किटचे १५० विद्यार्थिनींना मोफत वाटप केले.
प्राचार्य डॉ. अनिल पाटील म्हणाले, ‘सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये शारीरिक व मानसिक आरोग्यविषयक समस्या वाढत आहेत. स्त्री ही कुटुंबाचा कणा असते, जर स्त्रीला काही आरोग्यविषयक समस्या उद्भवल्या तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होत असतो. त्यामुळे महिलांनी आपल्याला काही आरोग्यविषयक समस्या जाणवत असल्या, तर मोकळेपणाने त्यावर बोलले पाहिजे, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, स्वतःची काळजी घेतली पाहिजे.’
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत महिला सक्षमीकरण कक्षाच्या प्रमुख डॉ. पुष्पा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अर्चना जाधव यांनी केले. आभार डॉ. सविता राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. अलका इनामदार, डॉ . स्वाती हाके, प्रा. विद्या पाटील, प्रा. रामेश्वरी कुदळे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी प्रा. लक्ष्मी पवार, डॉ. शुभांगी भोसले, प्रा. अरुणा सकटे, डॉ. रजनी कारदगे, प्रा. पूजा बुवा, महाविद्यालयातील इतर सर्व कनिष्ठ व वरिष्ठ विभागाकडील महिला प्राध्यापक व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.