कवठेएकंद स्फोट प्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल; समाजमंदिरात सुरू होते बेकायदेशीर कृत्य

सांगली (प्रतिनिधी)
कवठेएकंद (ता. तासगाव) येथील विश्वकर्मा पांचाळ समाज मंदिरात बेकायदेशीररीत्या शोभेच्या फटाक्यांसाठी दारूचा साठा करण्यात आला होता. या दारू साठ्याचा रविवारी दुपारी भीषण स्फोट झाला. यात ८ जण गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी ७ जणांवर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंदा नारायण यादव (वय ५५), विवेक आनंदराव पाटील (वय ३८), गजानन शिवाजी यादव (वय २८), अंकुश शामराव घोडके (वय २९), प्रणव रवींद्र आराध्ये (वय २१), ओंकार रवींद्र सुतार (वय २९), सौरभ सुहास कुलकर्णी (वय २७) (सर्व रा. कवठेएकंद, ता. तासगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी कि, दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने गावात पालखी सोहळा आयोजित केला जातो. या पालखीसमोर मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी केली जाते. त्यासाठी दसऱ्याच्या दोन महिने आधी गावात विविध ठिकाणी बेकायदेशीर फटाके तयार करण्याचे काम सुरू असते. अनेक घरांमध्ये व गल्लीबोळात ज्वालाग्रही पदार्थांचा वापर करून निष्काळजीपणे फटाके तयार केले जातात. यामुळे गावकऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होतो.
रविवारी दुपारी समाजमंदिरातील दारू साठ्याचा प्रचंड स्फोट झाला. या स्फोटामुळे गाव हादरले. घटनेवेळी तेथे उपस्थित असलेल्या आठ जणांना गंभीर दुखापत झाली. सर्व जखमींवर सांगलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामा करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी बेकायदेशीर स्फोटके साठवून जनजीवनास धोका निर्माण केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे करत आहेत.