मिरजेत पाठक ट्रस्टचे नाव घेऊन फसवणुकीचा धक्कादायक प्रकार

नागरिकांनी सावधानता बाळगून असे कोणतेही व्यवहार न करण्याचे ट्रस्टचे आवाहन
मिरज (प्रतिनिधी)
पाठक अनाथ आश्रम व पाठक ट्रस्टचा लोगो वापरून विनायक देशमुख या व्यक्तीने लग्नाच्या मुली असल्याचे सांगत सहा हजार रुपये ऑनलाईन भरण्यास सांगून अनेकांची फसवणूक केली असल्याची तक्रार ट्रस्टच्यावतीने मिरज शहर पोलिसात दाखल करण्यात आली. ही माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. मुकुंद पाठक यांनी पत्रकार बैठकीत दिली.
ते म्हणाले की, पाठक ट्रस्ट मिरजचे शासनमान्य बालगृह व विशेष दत्तकगृह १९४६ पासून कार्यरत आहे. सध्या येथे २३ लहान मुले व ६ बालके आहेत. गेल्या १५ दिवसांत काही व्यक्ती संस्थेच्या कार्यालयात येऊन विवाहासाठी पैसे जमा केल्याचे सांगू लागल्यानंतर आम्हाला धक्का बसला. एका अज्ञात व्यक्तीने ट्रस्टचे संचालक असल्याचे सांगून ६ हजार रुपये मागितले, बनावट ओळखपत्र व लोगो वापरले, तसेच एका महिलेच्या माध्यमातून ऑनलाईन पैसे भरण्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारे ८ ते १० जणांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. संस्थेत सहा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुली राहत नाहीत व विवाहासंदर्भात ट्रस्टचा कोणताही संबंध नाही असेही त्यांनी नमूद केले.
संस्थेचे नाव, लोगो व प्रतिष्ठेचा गैरवापर करून काही समाजकंटक विवाहेच्छुक उमेदवार व पालकांची फसवणूक करत आहेत. आतापर्यंत ७-८ जणांची फसवणूक झाल्याचे समजते, तर हा आकडा आणखी मोठा असू शकतो. त्यामुळे कोणतीही शंका असल्यास थेट ट्रस्टशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. पाठक यांनी केले. पत्रकार बैठकीस सहकार्यवाह व खजिनदार श्री. कुलकर्णी, मानद व्यवस्थापिका ऍड. सुचेता मलवाडे उपस्थित होत्या.