महावितरण-मनपाचा जागेचा वाद मिटला; स्फूर्ती चौक रस्त्यास महावितरण ४ हेक्टर जागा देणार – नीताताई केळकर

सांगली (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात महावितरण आता नवीन चार उपकेंद्रे उभारणार आहे. शिंदे मळा, कुंभार मळा आणि मिरजेतील गणी मळा या ठिकाणी उपकेंद्रे तर पंढरपूर रस्त्याच्या जागेवर ई-बससाठी चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या स्वतंत्र संचालिका नीता केळकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता अमित बोकील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महावितरण सांगलीचे कार्यकारी अभियंता आशिष मेहता उपस्थित होते.
यावेळी बोलताना केळकर म्हणाल्या, विश्रामबाग येथील आलदर चौक ते गव्हर्मेंट कॉलनीकडे जाणारा रस्ता रुंदीकरणाचे कामकाज सुरु आहे. यासाठी या मार्गावर असलेल्या महावितरण कार्यालयाची काही जागा रुंदीकरणामध्ये जाणार आहे. त्यामुळे या जागेच्या बदल्यात जागा मिळावी, अशी मागणी महापालिकेकडे केली होती. महापालिकेने त्यास सकारात्मकता दाखवली. महावितरणला ही जागा सांगलीतील शिंदे मळा, कुंभार मळा आणि मिरजेतील गणी मळा आणि पंढरपूर रस्ता या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या चारही ठिकाणी महावितरण आता नवीन चार उपकेंद्रे उभारणार आहे. शिंदे मळा, कुंभार मळा आणि मिरजेतील गणी मळा या ठिकाणी उपकेंद्रे तर पंढरपूर रस्त्याच्या जागेवर ई-बससाठी चार्जिंग स्टेशन उभारणार आहे.
केळकर म्हणाल्या, ही जागा महापालिकेकडून महावितरणला ९९ वर्षांच्या करारावर १ रुपये नाममात्र भाड्याच्या मोबदल्यात दिली आहे. यासाठी मागील अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरु होता. त्याला आता यश आले आहे. कृषीपंपाबाबत त्या म्हणाल्या कि, जिल्ह्यात आतापर्यंत ३३६२ जणांना कृषीपंप दिले आहेत. जिल्ह्यात १०३६५ रुफ टॉफ सोलर बसवण्यात आले असून त्यापैकी शहरातील ८५०० जणांनी याचा लाभ घेतला आहे. ४० हजार शेतकऱ्यांना सोलर पार्कचा फायदा सोलर पार्कबाबत माहिती देताना केळकर यांनी सांगितले,सोलर पार्कच्या बाबतीत सांगली जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात १७ ठिकाणी सोलर पार्कची उभारणी पूर्ण झाली आहे. तेथून १४४ मेगावॅट वीज निर्मिती होत असून याचा फायदा सुमारे ४० हजार शेतकऱ्यांना होत आहे. तर अद्याप १८ सोलर पार्क प्रस्तावित आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर तेथून १६९ मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे.