१३ ऑक्टोबरला सांगली जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण आरक्षण सोडत

सांगली (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाचे आरक्षण काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सोमवार (दि.१३) ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा परिषदेच्या ६१ गटांचे तसेच जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांमधील १२२ पंचायत गणांचे आरक्षण काढले जाणार आहे. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी अंतिम आरक्षण जाहीर होणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील लोकनियुक्त सदस्यांचा कार्यकाळ संपून तीन वर्षे होत आली आहेत. अनेक दिवसांपासून लांबलेली जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक आता तोंडावर आली आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या गट व गणांची प्रारूप रचना जाहीर झाली असून त्याची अंतिम घोषणा देखील करण्यात आली आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६१ गट निश्चित झाले असून दहा पंचायत समित्यांमध्ये १२२ गणांची निश्चिती झाली आहे. त्यानंतर जिल्हा परिषद गट व गणाचे आरक्षण कधी निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. ही उत्सुकता आता संपली असून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजवण्याचे दिवस जवळ आले आहेत.
राज्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाचे आरक्षण सोडत काढण्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी जागा निश्चित करण्यासाठी प्रस्ताव तयार करून ६ ऑक्टोबरला सादर केला जाणार आहे. ८ ऑक्टोबरला आयुक्त अंतिम मान्यता देतील. १० ऑक्टोबरला आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या ६१ गटांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत होणार आहे. त्याच दिवशी प्रत्येक तालुक्यात तहसीलदार कार्यालयात पंचायत समिती गटांसाठी आरक्षण काढले जाणार आहे. १४ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी प्रारूप आरक्षण जाहीर करतील. या आरक्षणावर १४ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती दाखल करता येणार आहेत. २७ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी हरकतींबाबतचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करतील. विभागीय आयुक्त ३१ ऑक्टोबरला अंतिम आरक्षण जाहीर करतील. ३ नोव्हेंबरला राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाणार आहे.