डोंगराई देवीमंदिर परिसराचे काम नित्कृष्ट ; वनमंत्र्यांकडे तक्रार – पृथ्वीराज देशमुख

सांगली (प्रतिनिधी)
कडेगाव (जि. सांगली) येथील प्राचीन व प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री डोंगराई मंदिर परिसरात वन विभागामार्फत सुरू असलेले सुशोभीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केला आहे. या कामाची सखोल चौकशी करून तातडीने गुणवत्तापूर्ण काम करण्याची मागणी त्यांनी वनमंत्री नामदार गणेश नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, डोंगराई मंदिर हे मोठे श्रद्धास्थान असून दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला गेला. त्याअंतर्गत वन विभागामार्फत सुशोभीकरणाचे काम सुरू आहे मात्र, हे काम अपेक्षित दर्जेदार न होता अत्यंत हलगर्जीपणे व निकृष्ट साहित्य वापरून होत असल्याचे स्थानिक पातळीवरही वारंवार निदर्शनास येत आहे. या प्रकरणाची क्वालिटी कंट्रोल विभागामार्फत तातडीने तपासणी करून दोषींवर शासन नियमांनुसार कठोर कारवाई केली जावी. तसेच उर्वरित काम गुणवत्तापूर्ण व पारदर्शक पद्धतीने करण्याची खात्री शासनाने करून द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.