साळुंखे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची भारतीय समाजसेवा केंद्रास भेट

मिरज (प्रतिनिधी)
येथील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयातील इंग्रजी विभागातर्फे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली येथील भारतीय समाजसेवा केंद्र संस्थेस भेट दिली. भेटीदरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना समाजामधील सामाजिक समस्या म्हणजेच अनाथ व निराधार गरजू बालके यांना प्रमुख सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी केले जाणारे प्रयत्न याबद्दल संस्थेच्या समन्वयक श्रीमती. दिपाली पाटील यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले.
याबद्दल बोलताना श्रीमती पाटील यांनी सांगितले की,संस्थेमार्फत समाजातील गरजू, आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील बालकांसाठी निशुल्क पाळणाघर चालविले जाते. तसेच शैक्षणिक सहाय्यता उपक्रमाद्वारे 1 ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन शिबिरे ,तज्ञांची व्याख्याने, अभ्यास सहली अशाही कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मागील 25 वर्षांपासून सांगली शहरांमध्ये सदर संस्था कार्य करत असून संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे चिपळूण, छ.संभाजीनगर येथे शाखा आहेत. त्यामार्फत अनाथ निराधार मुलांचे कायदेशीर दत्तकाद्वारे कायमस्वरूपी पुनर्वसन तसेच वस्तीपातळीवरील मुलांच्या सर्वागीण विकासासाठी आरोग्य ,शिक्षण, पालकत्व सत्रे यामधून सातत्यपूर्ण प्रयत्न केले जातात, अशी माहिती समन्वयक श्रीमती. दिपाली पाटील यांनी दिली.
यावेळी महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. पी.जी. पाटील यांनी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि संवेदना निर्माण करणे हेच या उपक्रमामागील मुख्य उद्दिष्ट होते असे नमूद केले. संस्थेच्या कार्याबद्दल योग्य व बहुमूल्य माहिती दिल्या बाबत महाविद्यालयातील सहा. प्रा. डॉ. आर. डी. कांबळे यांनी आभार मानले. सदर भेटीदरम्यान पाळणाघरातील मुलाना खाऊ दिला. या वेळी सहा. प्रा. श्रीमती व्हि. डी. पाटील व के. के. नदाफ याचबरोबर महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.