कन्या महाविद्यालयात “वित्तीय क्षेत्रातील गुंतवणूक व करिअरच्या संधी” विषयावरील कार्यशाळा उत्साहात

मिरज (प्रतिनिधी)
विद्यार्थिनींना आर्थिक सक्षमता समजणे आवश्यक आहे. महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे असून त्यासाठी पैश्याच्या व्यवस्थापनाचे कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. आपल्या प्रवृत्तीत व वर्तनात बदल करणे निकडीचे आहे. पैशाची बचत करून त्याची चांगली गुंतवणूक करता येते अशी माहिती डॉ. सूर्यवंशी मॅडम यांनी दिली. कन्या महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागामार्फत “ वित्तीय क्षेत्रातील गुंतवणूक व करिअरच्या संधी” या विषयावरील विशेष कार्यशाळा संपन्न झाली, यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य डॉ. उल्हास माळकर उपस्थित होते. प्रमुख उपस्थित म्हणून आयक्यूएसीचे को ओर्डीनेटर डॉ. सागर पाटील हे होते.
स्वागत व प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.विनायक वनमोरे यांनी केले. विद्यार्थिनींना सुद्धा उत्पन्नाचे विविध मार्ग शोधता येतात व त्यातून मिळालेले पैसे चांगल्या प्रकारे गुंतवता येतात असे त्यांनी प्रस्ताविकतेमधून स्पष्ट केले. अर्थतज्ञ डॉ. विजय ककडे यांनी वित्तीय क्षेत्रातील गुंतवणूक व त्यामध्ये निर्माण होणाऱ्या विविध करिअर संधींची माहिती विद्यार्थिनींना दिली. विद्यार्थिनींना उत्पन्न वाढवण्याचे मार्ग शोधण्याचे आवाहन त्यांनी केले. पैसा सांभाळायचे व तो वाढवायचे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. तसेच म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक फायद्याची असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेजचे प्राचार्य डॉ. उल्हास माळकर यांनी खर्च कमी करून उत्पन्नाचे मार्ग शोधावेत. त्यासाठी लागणारी विविध कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. पाहुण्यांचा परिचय प्राध्यापिका कोमल काळे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार आयक्यूएसीचे को ओर्डीनेटर प्रा. डॉ. सागर पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. मधुरा जाधव यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. शबाना मॅडम, प्रा. क्षितीज जाधव, प्रा. गंगाधर चव्हाण उपस्थित होते तसेच सहकारी प्राध्यापक,प्राध्यापिका, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.