कोल्हापूरात रंगला अभिजात मराठी भाषेचा वर्धापन दिन

दसरा चौक ते महाद्वार पर्यंत भव्य शोभायात्रा: विविध चित्ररथ व कलांतून मराठी संस्कृतीचे दर्शन
कोल्हापूर, (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध चित्ररथ… विविध पारंपरिक वेशभूषा… युगपुरुष छत्रपती शिवरायांचा घोड्यावरील राजेशाही थाट… विविध मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके…. ग्रामसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली विविध दरवेशी… जोडीला हालगी-ताशाच्या कडकडासोबत पारंपरिक वाद्यांचा गजर…. धनगरी ढोल वादनाचा दणदणाट आणि मराठी भाषेचा गगनाला भिडणारा जयघोष… या सर्वांचा अभूतपूर्व अनुभव कोल्हापूर शहरवासियांनी याची देही याची डोळा अनुभवला.. निमित्त होते मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या प्रथम वर्धापन दिनाचे..
राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग व शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे नेटके आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, उपशिक्षणाधिकारी अजय पाटील व कोजिमचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर आदी प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी ग्रंथदिंडीचे पुजन व कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर दसरा चौक ते बिंदू चौक मार्गे महाद्वार कमान पर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून आलेले हजारो मराठी अध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते. शोभायात्रेत प्रत्येक तालुक्यातील अध्यापकांनी स्वतंत्र एकच वेशभूषा धारण केली होती. तर अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कला सादर केल्या. त्यामध्ये मराठी भाषेची थोरवी सांगणारे फलक व थोर संत व साहित्यिकांच्या प्रतिमा झळकत होत्या. जोडीला महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे चित्ररथ सहभागी झाले होते. याशिवाय वारकरी वेशातील शेकडो शिक्षक, विद्यार्थ्यांच्या मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, ग्रामसंस्कृतीचे अविभाज्य भाग असलेले कडकलक्ष्मी, पोतराज, लेझीम खेळ,धनगरी ढोलवादन, आदिशक्ती आंबाबाईच्या रुपातील कित्येक विद्यार्थ्यांची रेलचेल होती. तर छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारुढ हुबेहूब प्रतिकृती शोभायात्रेत सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली.
शोभायात्रा महालक्ष्मी मंदिरात दाखल झाल्यानंतर तेथे जिल्ह्यातून आलेल्या अनेक शाळांनी आपली कला सादर करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मराठी भाषेचा महिमा सांगत मराठी भाषेच्या विकासासाठी व संवर्धनासाठी चालवलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सांगितले. यावेळी प्रत्येक तालुक्यातून आलेले शेकडो मराठी अध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले.
याप्रसंगी उपाध्यक्ष पी डी पाटील, विजय सरगर, सचिन यादव, अरुण कुंभार, सदाशिव -हाटवळ, सोनाली गाडेकर, मनिषा डांगे,एम एस पाटील, शशिकांत बैलकर, अशोक पोवार, युवराज कोथळे, डी.एस.गुरव, राजेंद्र खोराटे, अशोक भिके, संजय साबळे, महादेव शिवणगेकर, रुपाली मोटे, जयश्री पिंगळे आदी उपस्थित होते.