कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी घरकुलची दोषविरहीत यादी बनविण्यास पुढाकार घ्यावा-बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे
निपाणी,ता.10(प्रतिनिधी)-
निपाणीतील घरकुल वाटपावेळी मनमानी आणि गरिबांना डावलून बनविलेली यादी अत्यंत चुकीची होती. यामुळे आपण या यादीला विरोध करीत चारही हप्ते भरलेल्यांचा ड्रॉमध्ये समावेश करण्याची मागणी करीत होता. पण आमदारांनी याला विरोध केला. म्हणून आपण जिल्ह्याधिकाऱ्यांना ही माहिती देवून रितसर सर्व्हे करून यादी बनविण्याची मागणी केली होती. त्यानुसार नगरपालिका प्रशासनाने नवीन 1012 घरांची यादी बनविली आहे. त्याही यादीत दोष असून सर्व प्रकारची तपासणी करून अंंतिम यादी बनवावी. गरजू व्यक्ती घरापासून वंचित राहणार नाही यासाठी आपले प्रयत्न असून कॉग्रेस कार्यकर्त्यांनी दोन दिवसात घर असणाऱ्या मंडळींची यादीत नांवे असतील तर त्याची तक्रार करून दोषविरहीत यादी बनविण्यास व गरिबांना घरे मिळवून देण्यात पुढाकार घ्यावा असे आवाहन बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी केले.
शासकिय विश्रामधाम येथे प्रमुख कॉग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, यादीचा घोळ करून कार्यकर्त्यांना घरे देण्याचा प्रकार आम्ही आणून पाडला. यावेळी आम्हाला गरिबांचा घास हिसकाविला असल्याचा आरोप केला. पण अनेकांनी पाहिले आहे की पैसे भरूनही यादीत नांव नव्हते. त्यामुळे यादी बनविताना सर्व नियम धाब्यावर बसविले होते. म्हणून आपण ड्रॉ रद्दपर्यत पाठपुरावा केला. प्रातांधिकारी संपगांवी यांनी यादी रद्द करून नवीन बनविण्याच्या सुचना केल्या.पालिका प्रशासनाने 1012 जणांची यादी बनविली आहे. आश्रय कमिटी अस्तित्वात नसल्याने अध्यक्षही नाही. त्यामुळे प्रशासकाच्या निर्दशनानुसार यादी बनिवण्यात येत आहे. या नोटीस बोर्डावर लावलेल्या यादीतही अनेक घरे असलेली मंडळी आहेत. त्यामुळे पालिका कर्मचारी याचाही तपास करीत आहेत. त्यामुळे यादी बनविताना गरिब घरापासून वंचित राहू नये म्हणून कॉग्रेस कार्यकर्त्यांनी यादीची पडताळणी करून घरे असलेल्या मंडळींची अथवा ग्रामीण भागातील नांवे आली असतील तर त्याची तक्रार करून दोषविरहीत यादी बनविण्यास पुढाकर घ्यावा असे सांगितले.
सध्या तयार किती घरे आहेत,याचीही माहिती प्रसिध्द करून तयार घरापेक्षा जादार लाभार्थी असल्यास ड्रॉ पध्दतीने घरे वाटप करावीत. ड्रॉ करण्याअगोदर ग्रुप करता येणार नाहीत. हस्तातरानंतर 10 दिवसाच्या आतमध्ये ग्रुपने राहणाऱ्यांनी लेखी अर्ज देवून स्वइच्छेने राहणे गरजेचे आहे. घराचे अर्ज दाखल करणातना 200 रूपयांच्या बॉडवर लेखी लिहून दिलेल्या नियमात एखादा घर असताना चुकीचे लिहून दिले असल्यास त्याचे घर रद्द करण्याचा नियम आहे. त्यामुळे 12 जून अगोदर घरकुलाबाबत असलेल्या तक्रारी करणे गरजेचे आहे. त्यानंतर दोषविरहीत यादी करून जिल्ह्ाधिकारी तसेच जिल्हा पालकमंत्री सतिश जारकिहोळी, खासदार प्रियंका जारकिहोळी यांच्या निर्दशनास यादी आणून प्रसिध्दीस देवून घराचे हस्तातरण करावे असेही श्री चिंगळे यांनी सांगितले.
यावेळीकेपीसीसी सदस्य राजेश कदम, नगर नियोजन समिती अध्यक्ष संयोजीत ऊर्फ निकू पाटील, युवा नेते सुजय पाटील, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद, जयश्री लाखे, संजय सांगावकर, वैभव पाटील, अल्लाबक्ष बागवान, किरण कोकरे, विश्वास पाटील, दिपक ढणाल, अशोक लाखे, जीवन घस्ते, अस्लम शिकलगार, मुकुंद रावण, ॲड. प्रदीप पाटील,दिपक सावंत, यासीन मणेर, विनोद बल्लारी, प्रविण हेगडे, नंदकुमार कांबळे, किसन दावणे, जावेद कोल्हापूरे, फारूक गवंडी, मंगल घोरपडे, सलमा शेख, फरीदा बुखारी, अमीना मकानदार, शोभा जामुने, रेश्मा चिपळूणकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


