हालशुगर अध्यक्षपदी जयकुमार खोत उपाध्यक्षपदी गिता पाटील–नूतन पदाधिकाऱ्यांनी पदभार स्विकारला
निपाणी,ता.10(प्रतिनिधी)-
सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या श्री हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमपनदी जयकुमार आप्पासाहेब खोत तर उपाध्यक्षपदी सौ.गिता सुनिल पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा आज बुधवार (ता.10) रोजी कारखाना कार्यालयात करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून प्रांताधिकारी सुभाष संपगांवी यांनी काम पाहिले. यावेळी मावळते अध्यक्ष एम.पी. पाटील यांनी नूतन अध्यक्ष,उपाध्यक्षांना पदभार दिला.
यावेळी बोलताना एम.पी. पाटील म्हणाले, सहकारनेते बीडीसीसीचे चेअरमन अण्णासाहेब जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली आम.शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या अडीच वर्षाच्या काळासाठी नूतन निवडी बिनविरोध झाल्या आहेत. कारखान्याने प्रगतीची पाऊली टाकली आहेत. सभासद, शेतकरी आणि कामागारांच्या प्रगतीसाठी परिसराच्या सर्वांगिण विकासासाठी कारखाना कार्यरत आहे. नूतन पदाधिकारी या विकासात मोलाचे काम करतील त्यांना आमच्या सर्व संचालकांचे सहकार्य लाभणार असल्याचे सांगितले. संचालक समित सासणे यांनी आण्णा-वहिनींच्या मार्गदर्शनाने कारखाना प्रगती करताना सभासद आणि शेतकऱ्यांचे हित जपत आहे. नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष कारखान्याच्या प्रगतीसाठी चांगले काम करतील कारखाना प्रगतीपथावर येण्यासाठी आम्ही सर्व संचालक त्यांच्या पाठीशी खंबीर राहू असे सांगितले. तर संचालक श्रीकांत बन्ने, आनंदा यादव यांनीही कारखाना बंद अवस्थेकडे जात असताना आण्णा-वहिनींनी मोठ्या कष्टाने कारखान्याला उर्जिस्थावता आणली असल्याचे सांगून सर्वांचे सहकार्य लाभणार असल्याचे सांगितले.
नूतन अध्यक्ष जयकुमार खोत म्हणाले, अध्यक्षपदी जरी मी असलो तरी सर्व संचालक अध्यक्ष म्हणून काम करून आण्णा-वहिनींच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगतीपथावर आणू. शेतकरी, सभासदांसाठी लागणारी सर्व यंत्रणा कार्यरत ठेवून त्यांना चांगले उत्पन्न आणि चांगला नफा देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. तर उपाध्यक्षा गिता पाटील यांनी सभासद, शेतकरी कारखान्याचा महत्वपूर्ण घटक असून त्यांच्या विकासासाठी आण्णा-वहिनींच्या नेतृत्वाखाली काम करू असे सांगितले.
यावेळी माजी उपाध्यक्ष पवन पाटील, रामगोंडा पाटील, प्रकाश शिंदे, जयवंत भाटले, रमेश पाटील, रावसाहेब फराळे, विनायक पाटील, सुहास गुगे,वैशाली निकाडे, राजु गुंदेशा,रामगोंडा चौगुले, देवाप्पा देवकते, कार्यकारी संचालक आप्पासाहेब शिरगांवे, माजी उपनगराध्यक्ष सुनिल पाटील यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होता. स्वागत व आभार कार्यालयीन अधिक्षक गजानन रामनकट्टी यांनी मानले.


