जागतिक पर्यावरण दिनीच शतकभराच्या वटवृक्षाची कत्तल- हसूर खुर्द ग्रामस्थांमध्ये संताप ः अधिकाऱ्यांना निवेदन
से कापशी,ता.11(वार्ताहर)-
हसूर खुर्द, (ता.कागल)जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशीच गावातील एसटी स्टँडलगत असलेल्या शंभर वर्षांहून अधिक जुन्या वटवृक्षाची मुळासहित कत्तल गावातील जबाबदार व प्रतिष्ठित व्यक्तींकडून करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायत कार्यालयासमोरील हा वृक्ष अनेक पिढ्यांचा साक्षीदार मानला जात होता. त्याचीही कत्तल करण्यात आली याबाबत ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कागल यांना निवेदन देऊन तोडलेल्या झाडाबद्दल चौकशी व्हावी, झाड तोडत असताना परवानगी घेतली का याबाबत सखोल चौकशी होऊन दोषीवर कारवाई व्हावी व्हावी अन्यथा पर्यावरण प्रेमी नागरिक व सामाजिक संघटनाच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
गावातील मुख्य रस्त्यालगत उभ्या असलेल्या या विशाल वटवृक्षाच्या सावलीत शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रवासी अनेक वर्षे बसची प्रतीक्षा करत असत. त्यामुळे हा वृक्ष परिसरातील नैसर्गिक एसटी थांबाच बनला होता.उन्हाळ्यात त्याची दाट सावली ग्रामस्थांना मोठा दिलासा देत होती.केवळ आवश्यक फांद्या छाटण्याऐवजी संपूर्ण वृक्षच मुळासहित तोडण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जैवविविधतेचे संवर्धन आणि वृक्षलागवडीचा संदेश देणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनीच ही घटना घडल्याने नागरिकांनी तीव्र खंत व्यक्त केली आहे.
वाढते तापमान, बदलते हवामान आणि पर्यावरणीय असंतुलन याबाबत चिंता व्यक्त केली जात असताना अशा प्रकारे शतकभर सावली, प्राणवायू आणि आधार देणाऱ्या वटवृक्षाची कत्तल होणे चिंताजनक असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. अनेक पिढ्यांच्या आठवणी जपणारा हा वृक्ष स्वार्थापोटी कायमचा नाहीसा झाल्याने हसूर खुर्द परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्षसंवर्धनाला प्राधान्य देण्याची आणि अशा घटनांची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत असून सात दिवसाच्या आत जर दोषीवर कारवाई नाही झाली तर पर्यावरण प्रेमी व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
या निवेदनाची प्रत शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, गटविकास अधिकारी, उपवन संरक्षक वन विभाग, वनपरिक्षेत्र अधिकारी कागल, व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद कोल्हापूर, जिल्हाधिकारी कोल्हापूर, उपविभागीय अधिकारी यांना दिली आहे. निवेदनावर संतोष पाटील,सौ.कविता चावरे, प्रवीण मस्कर, विजय पाटील, एकनाथ पाटील,नामदेव पाटील, तुकाराम पाटील, पांडुरंग चावरे, संजय पाटील, रणजीत पाटील,किरण पाटील आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.


