ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशनकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात ; 1500 चादरींचे वाटप

सांगली (प्रतिनिधी)
सोलापूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांमध्ये आलेल्या अलीकडील पुरामुळे शेकडो कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून अनेकजण बेघर झाले आहेत. अशा संकटाच्या काळात ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन (AIBOC) महाराष्ट्र राज्य यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत पूरग्रस्तांसाठी मदतकार्य राबवले.
निलेशजी पवार यांच्या नेतृत्वाखाली AIBOC महाराष्ट्र राज्यतर्फे सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त कुटुंबांना 1500 चादरींचे वाटप करण्यात आले. थंडी आणि ओलसर वातावरणामुळे त्रस्त झालेल्या कुटुंबांना या मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला. आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी तत्परतेने पुढे येणे ही AIBOCची परंपरा असून, सामाजिक बांधिलकी जपण्यात संघटनेने नेहमीच पुढाकार घेतला आहे.
या प्रसंगी निलेश पवार (राष्ट्रीय उपाध्यक्ष, AIBOC तसेच सचिव, फेडरेशन ऑफ बँक ऑफ इंडिया), चंद्रशेखर मंत्री (क्षेत्रीय प्रबंधक, सोलापूर), महेंद्र धोणसे (सचिव, AIBOC महाराष्ट्र राज्य तसेच सचिव, बँक ऑफ इंडिया अधिकारी संघटना, विदर्भ युनिट), प्रमोद शिंदे (सचिव, AIBOC महाराष्ट्र राज्य तसेच सचिव, बँक ऑफ इंडिया अधिकारी संघटना, पुणे युनिट), अमोल सांगळे (अध्यक्ष, बँक ऑफ इंडिया अधिकारी संघटना, पुणे युनिट), शरणापा पुजारी, मगर साहेब (तहसीलदार, अक्कलकोट), राम वाखरडे, दिपक वाडेवाले, बाबाजी काटकर, राहूल मांजरे, महेंद्र मोराळे, महेश गुटे (बँक ऑफ इंडिया, अक्कलकोट तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी) उपस्थित होते.