सांगलीत रॅम प्रोग्रॅमचे आयोजन ; उद्योजकांना नाविन्यपूर्ण व्यवसायवृद्धीचे मार्गदर्शन

सांगली (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य लघुउद्योग महामंडळ व जागतिक बँकेच्या (वर्ल्ड बँक) संयोजनातून रॅम प्रोग्रॅम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून सांगलीत सिद्धार्थ अकॅडमी येथे सौ. सविता यादव, प्रशांत भोसले सर व सौ. सुजाता यादव यांच्या संयोजनाने, आयसेक्ट लिमिटेडच्या सहकार्याने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रोग्रॅममध्ये उद्योजकांना व्यवसायातील विविध नाविन्यपूर्ण संधी, व्यवसायवृद्धीसाठी मार्गदर्शन तसेच व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या कर्ज प्रक्रियेबाबत माहिती व प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
बँक ऑफ इंडिया सांगलीचे एफ.एल.सी. अधिकारी दीपक क्षीरसागर यांनी डिजिटल व्यवहारातील फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, ई-केवायसी, सुरक्षा व जीवनज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना, शेतकऱ्यांसाठी नाबार्ड अंतर्गत केसीसी योजना अशा विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे, महिलांनी शेतीसोबत जोड व्यवसाय करावा याबाबतही त्यांनी उद्योजिकांना प्रेरित केले. प्रशांत भोसले यांनी उद्योजकांना व्यवसाय वाढीच्या विविध मार्गांबाबत मार्गदर्शन करताना डिजिटल व्यवहाराचा योग्य वापर कसा करावा, डिजिटल कर्ज प्रक्रिया कशी कार्यरत होते व त्यासाठी अर्ज कसा करावा याविषयी सविस्तर माहिती दिली. सदर कार्यक्रमात सुमारे ७५ उद्योजकांचा सहभाग होता, यामध्ये महिला उद्योजकांचा सहभाग लक्षणीय होता.