कमला कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त प्रो. डॉ. मांतेश हिरेमठ यांचे व्याख्यान

ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर क्रांतीकुमार पाटील साहेब यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
कोल्हापूर. (प्रतिनिधी) ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेजमध्ये डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त डिजिटल युगात वाचन संस्कृतीचे महत्त्व या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कमला कॉलेजच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले की शैक्षणिक महाविद्यालयांमध्ये ग्रंथालयामध्ये विविध प्रकारचे वाचन साहित्य विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले असते त्याचा विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक, सामाजिक व मानसिक व्यक्तिमत्व विकासासाठी वापर करून घेणे अतिशय गरजेचे आहे. डिजिटल साधनांच्या वापरा बरोबरच छापील स्वरूपातील पुस्तके वाचणे ही तितकेच महत्त्वाचे आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रो. डॉ. मांतेश हिरेमठ यांनी आपल्या व्याख्यानामध्ये वाचन करण्याचे विविध फायदे सखोल व सविस्तर विशद केले. यामध्ये पुस्तके वाचनामुळे सहनशीलता वाढते, मानसिक आरोग्य चांगले राहाते, संघ भावना निर्माण होते, शब्दसंग्रह विपुल होतो, व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो यासारख्या विविध मुद्द्यांवरती सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विविध समाज सुधारक आणि त्यांचे चरित्र सावित्रीबाई फुले, ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज यांच्या जीवनपटाचा आणि ओव्यांचा संदर्भ देत सरांनी अगदी सोप्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सदर व्याख्यानाचे आयोजन करण्यामध्ये ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर क्रांतीकुमार पाटील साहेब यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.कार्यक्रमाच्या आयोजक क्रांतिवीर रंगरावदादा पाटील ग्रंथालयाच्या ग्रंथपाल प्रा. उर्मिला कदम यांनी वाचनाने विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व कसे विकसित होते, पुस्तके वाचण्या सोबतच डिजिटल तंत्रज्ञानाचा सुद्धा स्वीकार करणे ही आजची काळाची गरज आहे याबद्दल आपल्या प्रास्ताविकामध्ये विशद केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. माधवी माळी यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. श्रीदेवी वाघमारे यांनी केले. याप्रसंगी प्रा.डॉ. सुजय पाटील, प्रा. डॉ.पूजा पाटील, प्रा.पैठने, प्रा. प्रियांका माळी, ग्रंथालय सहाय्यक पूर्वा थोरे यांच्यासह सर्व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.