विवेकशील विचारासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक – डॉ. संजय अंकुशराव
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या, प्रो. डॉ. पी. बी. पिस्टे ह्या होत्या.
कोल्हापूर (प्रतिनिधी): एकविसावे शतक हे विज्ञान आणि तंत्रज्ञांनाचे युग आहे. ह्या युगात वावरणार तरुण जर विवेकवादी विचार करणारा नसेल तर तंत्रज्ञानाचा वापर तो घातक कामासाठी करेल. त्यासाठी ह्या तरुणाईकडे जर वैज्ञानिक दृष्टिकोन आला तर तो विवेकवादी विचार करेल. पर्यायाने चांगले सामाजिक वातावरण अस्तित्वात येण्यास ते साहाय्यभूत ठरेल असे मत डॉ. संजय अंकुशराव यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेचे राजर्षी छ. शाहू कॉलेज कदमवाडी रोड कोल्हापूर येथे विज्ञान मंडळ व विवेक वाहिनीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या विशेष व्याख्यानात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या, प्रो. डॉ. पी. बी. पिस्टे ह्या होत्या. प्रो. डॉ. पिस्टे यांनी आपल्या मनोगतात प्रारंभी सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पुढे त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञान कसे काम करते हे उपस्थितांना सोदाहरण पटवून दिले. तसेच सामाजिक आरोग्यासाठी विवेकशील विचारांची जोपासना करण्याचे आवाहन केले. ह्या व्याख्यानास महाविद्यालयाच्या विज्ञान मंडळ व विवेक वाहिनीचे सर्व सदस्य, सिनिअर विभागाचा सर्व स्टाफ, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुणे यांचा परिचय विज्ञान मंडळ व विवेक वाहिनीचे समन्वयक डॉ. समाधान पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपाली मालवेकर यांनी केले. तर आभारप्रदर्शन डॉ. अर्चना पाटील यांनी केले.
00000


