पूरग्रस्तांसाठी कमला कॉलेजचा मदतीचा हात

उपक्रमाचे आयोजन ताराराणी विद्यापीठ संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले
कोल्हापूर, (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील अलीकडील पुरपरिस्थितीत बाधित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी कमला कॉलेज, कोल्हापूर यांनी सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे. महाविद्यालयाच्या वतीने विविध प्रकारचे खाद्यान्न आणि आवश्यक वस्तू संकलित करून त्या स्थानिक प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या असून, या वस्तू प्रशासनामार्फत पूरग्रस्त भागांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.
महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी या सामाजिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. नागरिकांना मदत करण्याच्या हेतूने अत्यावश्यक वस्तूंचे संकलन करण्यात आले. ही सामग्री नियोजनबद्ध पद्धतीने महाविद्यालय परिसरात जमा करून त्यानंतर शिवाजी विद्यापीठ व स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने संबंधित पूरग्रस्त भागांतील प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली.
या उपक्रमाचे आयोजन ताराराणी विद्यापीठ संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव श्री. प्राजक्त पाटील, प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर, प्रा. डॉ. सुजय पाटील, प्राध्यापकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या या सामाजिक कार्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, सहवेदना आणि जबाबदारीची भावना अधिक दृढ झाली आहे.