योजनेअंतर्गत ट्रॅक्टर व कृषी अवजारांचे वाटप; शेतकऱ्यांसाठी लाभदायक योजना
हळदी 15 (प्रतिनिधी) केंद्र शासनाच्या Agriculture Infrastructure Fund (AIF) या योजनेअंतर्गत बँक ऑफ इंडिया, सडोली (खालसा) शाखेमार्फत एकाच वेळी ३० शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व कृषी अवजारांसाठी कर्जवाटप करण्यात आले. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देत कृषी क्षेत्राचा विकास साधण्याचा हेतू व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी बँक ऑफ इंडिया स्टार कृषी विकास केंद्राचे कोल्हापूर जिल्हा व्यवस्थापक अमोल फुले म्हणाले, “AIF योजनेत शेतकऱ्यांना केवळ ९ टक्के कमी व्याजदराने कर्ज मिळते. नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ३ टक्के व्याजदरावर सवलत मिळते. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती उपकरणे खरेदी करणे सुलभ झाले असून, उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होईल. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी शाखा व्यवस्थापक भगवान जयभाय म्हणाले, “या योजनेंतर्गत मिळालेल्या ट्रॅक्टर व अवजारांचा जास्तीत जास्त उपयोग करून शेती उत्पादनात वाढ साधावी. आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यासाठी अशा योजना उपयुक्त ठरतात.”
या कार्यक्रमास सडोली शाखेचे सर्व अधिकारी, स्टार कृषी सेवा केंद्राचे अधिकारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


