शेतकऱ्यांच्या अभूतपूर्व गर्दीत तासगावात ‘चक्काजाम’ ; माजी खासदार संजयकाकांचा ‘कर्जमुक्ती’साठी एल्गार !

0
IMG-20251014-WA0463

सांगली (प्रतिनिधी)

निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच शेतकरी आज कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणे ही सरकारची जबाबदारी आहे. बळीराजाच्या आणि सर्वसामान्यांच्या बाजूने बोलणारा आवाज आता मंदावला आहे; मात्र या जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय मिळेपर्यंत मी गप्प बसणार नाही, असा ठाम निर्धार माजी खासदार संजयकाका पाटील यांनी तासगावातील चक्काजाम आंदोलनात व्यक्त केला.

शेतकरी कर्जमाफी या मुख्य मागणीसह विविध प्रश्नांसाठी तासगाव येथे झालेल्या चक्काजाम आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. हजारोंच्या संख्येने आलेल्या शेतकऱ्यांसह शेकडो ट्रॅक्टर, बैलगाड्या, शेळ्या, मेंढ्या आणि जनावरांमुळे संपूर्ण शहर ठप्प झाले. शहरात तसेच ग्रामीण भागातून येणारे सर्व रस्ते जाम झाल्याने प्रचंड वाहतूक कोंडीचे दृश्य दिसत होते.

आंदोलनावेळी माजी खासदार संजयकाका पाटील म्हणाले, “इथं जमलेले प्रत्येकजण शेतकऱ्याची लेकरं आहोत. जगातील प्रत्येक माणूस स्वतःसाठी जगतो, पण शेतकरी मात्र स्वतःबरोबर जगाला जगवतो. आज या पोशिंद्याचं आयुष्यच संकटात आलं आहे. गेल्या चार-पाच वर्षांत निसर्गाचा लहरीपणा आपण अनुभवतो आहोत. कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ. ऑक्टोबर संपत आला तरी रानातलं पाणी सुकत नाही, आणि आमच्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रूही थांबत नाहीत.”

ते पुढे म्हणाले, “यावर्षी नुकसान झालं की पुढच्या वर्षी भरपाई मिळेल या आशेने शेतकरी पुन्हा कर्ज काढतो. पण उत्पन्न आणि खर्चाचा मेळच बसत नाही. त्यामुळे तो बँक, पतसंस्था, सावकार यांच्या कर्जाच्या जाळ्यात अडकतो. या दुष्टचक्रातून सुटका करायची असेल, तर सरकारने सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे हाच एकमेव उपाय आहे. त्यासाठी मी शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावूनच नव्हे, तर त्यांच्यापुढे राहून लढणार आहे. तुमचा माझ्यावरचा विश्वास कधीही डळमळू देणार नाही.”

मोर्चासमोर बोलताना युवा नेते प्रभाकर पाटील म्हणाले, “मी स्वतः शेतकरी आहे. द्राक्ष बागेचा खर्च परवडेना म्हणून मी आंब्याची बाग लावली; पण आता वाटतं द्राक्षबाग बरी होती की काय ! कारण शेतीत केलेला खर्च आणि मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळच लागत नाही. हिशेब बघायला गेलं की मन खचतं. चार-पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या पोरांना सुद्धा लग्नासाठी मुलगी मिळणं अवघड झालंय, कारण पोरीचे वडीलही ही वस्तुस्थिती ओळखतात.”

सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास तासगाव बसस्थानक चौकातून चक्काजाम आंदोलनाची सुरुवात झाली. ट्रॅक्टर, बैलगाड्या, जनावरे, शेळ्या-मेंढ्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने तासगावात दाखल झाले. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर फक्त शेतकरी आणि त्यांची वाहने दिसत होती. शहराच्या बाहेरही काही किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, अशी दृष्ये दुपारपर्यंत कायम राहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *