भाजपचे वनखंडे आता काँग्रेसमध्ये ; कोल्हापुरात काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत केला प्रवेश
मिरजेतील भाजपच्या दुहीचा काँग्रेसने नेमका फायदा उचलल्याची सर्वत्र चर्चा
मिरज (प्रतिनिधी)
राज्यात अनेक जिह्यात भाजपाला मोठे धक्के बसले आहेत. मिरजही त्यात मागे नाही. भाजपा अनुसुचित जाती जमाती मोर्चाचे प्रदेश चिटणीस प्रा. मोहन वनखंडे यांनी आज भाजपाचा त्याग करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजीत कदम यांच्यासह अनेक काँगेस नेत्यांनी प्रा. वनखंडे यांचे पक्षात स्वागत केले. दरम्यान काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी जिल्हा काँग्रेसमयी करण्यासाठी आग्रही असल्याचे सांगितले होते. यासाठी आपण काहीही करू असे ते म्हणाले होते. त्यामुळे मिरजेतील भाजपमध्ये पडलेल्या दुहित काँग्रेसने सरशी केल्याची चर्चा आहे.
प्रा. मोहन वनखंडे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचे सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. विद्या मंदिर प्रशालेत प्राध्यापकी करणाऱ्या वनखंडे यांनी 2004 मध्ये जत विधानसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख म्हणून कार्य केले. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्याशिवाय या कालावधीत पार पडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीत भाजपाची सत्ता आणण्यात त्यांनी हिरीरीने सहभाग नोंदविला होता. त्यांच्या पत्नी सौ. अनिता वनखंडे या महापालिकेत भाजपाच्या समाजकल्याण सभापती म्हणून कार्यरत असताना सुमारे 78 कोटी रुपयांचा विकास निधी मिळवून दिला होता.
गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे आणि प्रा. वनखंडे यांच्या दूरावा निर्माण झाला होता. त्यामुळे शहरात भाजपाचे स्वतंत्र कार्यालय सुरू करुन त्यांनी आपले पक्ष कार्य सुरूच ठेवले होते. पक्षकार्य करीत असताना पालकमंत्र्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यामुळे वनखंडे भाजपा सोडणार का ? याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू होत्या. शेवटी त्यांनी आज भाजपाचा त्याग करुन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
दरम्यान, राहूल गांधी यांच्या उपस्थितीत आज कोल्हापूरात भव्य संविधान सन्मान संमेलन पार पडले. यामध्ये प्रा. वनखंडे यांनाही सहभागी करुन घेण्यात आले. तसेच अनेकांनी प्रा. वनखंडे यांच्या पक्ष प्रवेशाचे स्वागत केले. प्रा. वनखंडे अनेक वर्षे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होते. 2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या विजयासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी बजावली होती. पण त्यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याने ते काही दिवसांपासून खाडेंपासून दूरावले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते काँग्रेस पक्ष प्रवेश करुन पालकमंत्री खाडेंना आव्हान देणार का? याकडे अनेकांच्या नजरा होत्या. त्यास आज पूर्णविराम मिळाला. वनखंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाने भाजपाला धक्का बसलाच शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत अतिशय चुरशीची होणार, अशा चर्चाही रंगू लागल्या.
दसरा कालावधीत भव्य मेळावा
प्रा. मोहन वनखंडे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर दसऱ्याच्या कालावधीत मिरजेत काँग्रेसचा भव्य मेळावा आयोजित केला जाणार आहे. यावेळी प्रा. वनखंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या भाजपामधील माजी नगरसेवकांसह जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच, सोसायटी चेअरमन आणि अनेक जबाबदार कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजीत कदम, काँग्रेसनेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्यासह राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.