राज्य राखीव पोलीस बलाच्या वतीने वाशी नाका येथे रन फॉर युनिटी’ उपक्रम
हळदी (प्रतिनिधी): भारताचे ‘लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राज्य राखीव पोलीस बलाच्या वतीने नवीन वाशी नाका येथे ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेचा संदेश देण्यासाठी एकता दौड काढण्यात आली.
या दौडीत नागरिक, पोलीस अधिकारी, विद्यार्थी, पत्रकार आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर म्हणाले, “सरदार पटेल यांच्या भारताच्या राजकीय एकत्रीकरणातील महत्त्वपूर्ण योगदानाचे स्मरण करणे आणि नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकता, अखंडता व बंधुत्वाची भावना बळकट करणे हा या दौडीचा मुख्य उद्देश आहे.” उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनाची सामूहिक शपथ देत देशाची एकता व अखंडता अबाधित राखण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमाला सहाय्यक समादेशक महांतेश तल्लूर व संजय कांबळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन व प्रस्ताविक पोलीस उपनिरीक्षक अशोक गुजर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांनी परिश्रम घेतले.


