मोहन वनखंडे यांची शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी निवड

0
1000781313

मिरज (प्रतिनिधी)

शिवसेनेच्या सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्र तसेच मिरज पूर्व भागातील चार जिल्हा परिषद गटांची जबाबदारी पक्षाचे नेते मोहन वनखंडे यांच्याकडे देण्यात आली आहे. मोहन वनखंडे यांच्याकडे प्रभारी महानगर प्रमुखपदाची (सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेसोबत कवलापूर, भोसे, म्हैसाळ व मालगाव जिल्हा परिषद गट) जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली असल्याचे मोहन वनखंडे यांनी सांगितले. मिरज शहरासह ग्रामीण भागात मोहन वनखंडे यांचा व्यापक संपर्क आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते विरोधी पक्षांचे संभाव्य उमेदवार आणि मतदार संघातील प्रबळ दावेदार नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरी भागात पक्ष बांधणी व चाचपणी सुरू केली होती. मिरज मतदार संघातील म्हैसाळ, मालगाव व कवलापूर हे तीन विधानसभा मतदारसंघ मागासवर्गीय स्त्री राखीव आहेत; तर भोसे जिल्हा परिषद गट खुल्या प्रवर्गासाठी आहे. मोहन वानखडे यांचा मतदारसंघातील राजकीय प्रभाव लक्षात घेता त्यांच्याकडे महानगरपालिका क्षेत्रासोबतच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद गटांची जबाबदारी देण्यात आली आहे. मिरज विधानसभा मतदारसंघात शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवेल, असा अंदाज यामुळे व्यक्त केला जात आहे.

मोहन वनखंडे यांच्या निवडीमुळे शिवसेनेच्या गटामध्ये उत्साह दिसून येत आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मोहन वनखंडे यांची शिवसेनेच्या महानगरपालिका व जिल्हा परिषद गटांच्या प्रमुखपदी निवड झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा दिल्या. शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या हस्ते वनखंडे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. सचिव मोरे यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *