कुंभी कारखाना सांगरूळ रस्त्यावर निकृष्ट पँचवर्कचे काम
खड्ड्यात खडी टाकून वरून टाकले डांबर
कोपार्डे,(प्रतिनिधी) सांगरूळ फाटा ते सांगरूळ येथे खड्ड्यात डांबर न टाकता खडी टाकून सभोवताली व वरून डांबर टाकले जाते. ही बाब लक्षात येताच प्रकाश मुगडे यांनी काम बंद पाडले. यावेळी प्रकाश मुगडे, प्रकाश शीपेकर व ग्रामस्थांनी बांधकाम खात्याचे सिव्हिल इंजिनियर गौरव कुलकर्णी यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. यावेळी जाता येता वाहन चालकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
सांगरूळ रस्त्याबरोबरच सांगरूळच्या पश्चिम भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत .खड्ड्यातील सलगतेमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. यामुळे वाहन चालकाला वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. सांगरूळ फाटा ते सांगरूळ खाटांगळे हा पाच किलोमीटर लांबीचा रस्ता या भागातील दळणवळणाचा प्रमुख मार्ग आहे .
सांगरूळच्या पश्चिम भागातील खाटांगळे, आमशी, पासार्डे, बोलोली, उपवडे सह बारा वाड्या तसेच म्हारुळ, बहिरेश्वर पासून आरळे, घाणवडे पर्यंत तुळशी खोऱ्यातील वाहतूक या मार्गावरून होत असते.कारखान्याच्या हंगामामध्ये या भागातील उसाची वाहतूकही या मार्गावरूनच होते .तसेच कुंभी ,स ब खाडे व डी सी नरके,श्रीराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज औद्योगिक प्रशिक्षण संस्था याशिवाय कुंभी यशवंत बँक ऑफ बडोदा आय सी आय सी बँक श्रीपतराव दादा बँक असा शैक्षणिक व सहकार संकुल व विविध प्रकारचे व्यावसायिक असल्याने या रस्त्यावरून नेहमीच वर्दळ असते .
सांगरूळ फाट्यापासून सांगरुळ पर्यंत रस्त्यात खड्ड्याचे मोठे साम्राज्य पसरले आहे .या रस्त्यावर सलग पाच फूट रस्ता विना खड्ड्याचा नाही .यामुळे चार चाकी बरोबरच दुचाकी वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे .यामुळे वाहन चालकांबरोबर पादचाऱ्यांना प्रवास करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आज खड्डे भरण्याची काम सुरू झाले .यावेळी प्रकाश मुगडे, प्रकाश शिपेकर, ग्रामस्थ ,तरुण यांनी सकाळी विनंती वजा इशारा दिला होता व सायंकाळी निकृष्ट दर्जाचे काम बंद पाडले.
गणपती नंतर पुन्हा आता खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. खड्ड्यात डांबर न टाकता खडी टाकून त्यावर डांबर मारून खड्ड्याचे सभोवताली डांबर मारून लहान खडी टाकून रोलिंग केले जात आहे. आता भरलेले खड्डे हाताने निघाले, असे निकृष्ट काम केले आहे. यामुळे अपघात होत आहेत, आम्ही काम बंद पाडले आहे. काम व्यवस्थित करावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा प्रकाश मुगडे खाटांगळे यांनी दिला.


