एनसीसी गट मुख्यालय, कोल्हापूरतर्फे एनसीसी स्थापना दिवस उत्साहात साजरा
कोल्हापूर, ता.24 (प्रतिनिधी) एनसीसी गट मुख्यालय कोल्हापूरतर्फे ७८ वा एनसीसी स्थापना दिवस २२ व २३ नोव्हेंबर २०२५ रोजी कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील सर्व युनिट्स आणि शैक्षणिक संस्था यांच्या उत्स्फूर्त सहभागाने साजरा करण्यात आला. एनसीसीच्या शिस्त, नेतृत्वगुण आणि समाजाभिमुखता या मूल्यांना पुनः अधोरेखित करणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कोल्हापूरमध्ये सर्व बटालियन आणि संस्थांमध्ये एनसीसी डे परेड, ध्वजारोहण, एनसीसी गाण्याचे सादरीकरण आणि प्रतिज्ञाविधी आयोजित करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणे, शाळा आणि युद्धस्मारकांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच निबंध, वादविवाद, प्रश्नमंजुषा आणि पोस्टर-मेकिंग स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व उपक्रमांमुळे युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, नेतृत्वगुण आणि नागरिकत्वाची भावना दृढ झाली.
सांगली, सातारा आणि कराड येथील युनिट्सनीही एनसीसी डे परेड, ध्वजारोहण, एनसीसी प्रतिज्ञाविधी आणि स्वच्छता अभियान राबवून ७८ वा स्थापनेदिन साजरा केला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये एनसीसी परेड, ध्वजारोहण, एनसीसी गाणे, प्रतिज्ञाविधी यांसह समुद्रकिनारी आणि जलसंपन्न भागांत विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या माध्यमातून पर्यावरण व सागरी परिसंस्थेबाबत जनजागृती करण्यात आली.
या निमित्ताने ब्रिगेडियर आर. के. पैठणकर, गट कमांडर, एनसीसी गट मुख्यालय कोल्हापूर यांनी सर्व अधिकारी, प्रशिक्षक कर्मचारी, एएनओ आणि एनसीसी कॅडेट्स यांना त्यांच्या सक्रिय सहभागाबद्दल हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन दिले.


