गुरुवर्य डी. डी. आसगावकर गौरव पुरस्काराने प्राचार्य डॉ. जी. व्ही. खाडे सन्मानित 

0
1000305446

प्राचार्य डॉ. जी. व्ही. खाडे यांचे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य

कोल्हापूर  (प्रतिनिधी): शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी मेन राजाराम हायस्कूल अँन्ड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. खाडे यांना गुरुवर्य डी. डी. आसगावकर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यांत आले. 

       येथील गोविंदराव टेंबे रंगमंदिर देवल क्लब येथे कुडित्रे ता. करवीर येथील गुरुवर्य डी. डी. आसगावकर शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा विकास ट्रस्टच्या वतीने संपन्न झालेल्या भव्य समारंभात रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत दळवी, मुंबई येथील डॉ. चंद्रकांत पाटील, आमदार प्रा.जयंत आसगावकर, रयत शिक्षण संस्था दक्षिण विभागाचे प्रमुख एम. बी. शेख यांच्या हस्ते प्राचार्य डॉ. जी. व्ही. खाडे यांना गुरुवर्य डी. डी. आसगावकर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गौरव पुरस्कार मेडल, विशेष सन्मान पत्र, सन्मानचिन्ह व फेटा असे या पुरस्काराचे स्वरुप होते.

     प्राचार्य डॉ. जी. व्ही. खाडे यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर कोल्हापूर जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोहोर उमटविली आहे. सांगरूळ सारख्या ग्रामीण भागातून आलेले कर्तव्यप्रेमी शिक्षक ते मेन राजाराम कॉलेजचे प्राचार्य पर्यंत घेतलेली उत्तुंग झेप ही अभिनंदनीय आणि प्रेरणादायी आहे. 

   १५ जानेवारी १९९७ पासून मेन राजाराम प्रशालेत रसायनशास्त्र विषयासाठी सहाय्यक शिक्षक म्हणून डॉ. जी. व्ही. खाडे यांनी शैक्षणिक कार्यास सुरुवात केली. कनिष्ठ स्तरावर २७ वर्षे अध्यापन कार्य करीत प्राचार्य पदावर गेली २ वर्षे कार्यरत आहे. डॉ. जी. व्ही. खाडे यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, सीईटी परीक्षा, शिक्षण उपसंचालक कार्यालय व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग विविध प्रशासकीय समितीत कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेने राज्यस्तरीय १९ वर्षाखालील मुलींच्या खो-खो स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळविले असून राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.

     विद्यार्थ्यांनी एन.एम.एम.एस. परीक्षेत अनमोल यश प्राप्त केले आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन इंडिया यांच्या द्वारे इन्स्पायर-मानक योजनेअंतर्गत पुरस्कारासाठी विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.डॉ. जी. व्ही. खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दहावी व बारावीच्या निकालाची गुणवत्तापूर्ण वैभवशाली परंपरा प्रशालेने कायम ठेवली आहे. त्याच बरोबर मेन राजाराम प्रशालेला संवर्धनासाठी व आधुनिकीकरणासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ६ कोटी५७ लाख५५हजार३७९ रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे.

  केंद्र शासनाच्या पीएमश्री योजने अंतर्गत प्रशालेची निवड झाली आहे. विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी वैज्ञानिक, कुलगुरू, प्राचार्य,प्राध्यापक, विचारवंताना, साहित्यीकांना, लेखकांना, कवींना तसेच तज्ञ लोकांना प्रशालेत बोलावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळवून दिले. इन्स्पायर संशोधनाच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या संशोधन करण्यासाठी चालना दिली आहे. विकासाभिमुख शिस्तप्रिय,उत्तम प्रशासक, उपक्रमशील व विद्यार्थीप्रिय प्राचार्य म्हणून कोल्हापूर परिसरामध्ये त्यांची ख्याती आहे. विद्यार्थीभिमुख सवेंदनशील प्रशासनातील व्यक्तिमत्त्व अशी त्यांची खासियत आहे.यांच्या या कार्याची दखल घेऊन गुरुवर्य डी. डी. आसगावकर शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा विकास ट्रस्टच्या वतीने गुरुवर्य डी. डी. आसगावकर गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

    हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याच्या माजी शिक्षण संचालिका सौ. उज्जवलादेवी वसंतराव पाटील व माजी प्राचार्य डॉ.वसंतराव पाटील, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी व पदाधिकारी साहित्यिक, संपादक, पत्रकार,वकील, डाॅक्टर, नातेवाइक तसेच महाविद्यालयाचे माजी प्राचार्य विजय डोणे, उपप्राचार्या श्रीमती व्ही. ए. खडके, पर्यवेक्षिका श्रीमती एस. व्ही. पत्रावळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख बी.पी.माळवे यांच्या सहित शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी प्राचार्य डॉ. जी. व्ही. खाडे यांचे अभिनंदन केले आहे. या पुरस्काराने मेन राजाराम हायस्कूल अँन्ड ज्युनिअर कॉलेजच्या यशस्वी वाटचालीतील आणखी एक मानाचा तुरा प्राप्त खोवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *