जिज्ञासा हा जीवन समृद्धतेचा मार्ग : डॉ. आर. आर. कुंभार

0
1000305412

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले हे होते. 

कोल्हापूर  (प्रतिनिधी): जीवन जगणे ही कला आहे. ती कला आपण आत्मसात करा. त्यासाठी आयुष्यभर जिज्ञासू राहा. ही जिज्ञासा जेव्हा संपेल तेव्हा माणूस म्हणून असणारे आपले अर्धे अस्तित्व संपलेले असेल असे मत माजी प्राचार्य व प्रसिद्ध वक्ते डॉ. आर. आर. कुंभार यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेचे राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कदमवाडी रोड कोल्हापूर येथे महाविद्यालयाची संशोधन कमिटी आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या विशेष व्याख्यानात बोलत होते. हे व्याख्यान विद्यार्थ्यांच्यामध्ये उच्च शिक्षणाची आवड निर्माण करणे. संशोधक विद्यार्थी यांना अद्ययावत विचार व प्रगतीची माहिती करून देण्यासाठी आयोजित करण्यात आले होते. ह्या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले हे होते. 

        डॉ. कुंभार यांनी आपल्या विवेचनात जगभरातील उदाहरणांच्या साह्याने जिज्ञासा, शिक्षण, श्रमनिष्ठा आणि मानवी जीवनमान सुधारण्यासाठीचे विज्ञानाचे योगदान ह्या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. शिक्षणाने जीवनमान उंचावते. त्या शिक्षणाच्या सहाय्याने आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करायला मिळणे ही खूप आनंददायी गोष्ट आहे. ह्या आनंदासाठी आपण खूप श्रम घेत असतो. तसे आयुष्यात श्रमाला खूप महत्त्व आहे. हे श्रम आयुष्यातून निघून जाणं म्हणजे आपले अर्धे माणूसपण निघून जाण्यासारखं आहे. त्यामुळे श्रमाची प्रतिष्ठा जपूयात. स्वश्रमाविषयी जशी आपण निष्ठा बाळगतो तशी इतरांच्या श्रमाप्रतीही निष्ठा बाळगूयात. असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. 

    माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे. आपल्या बुद्धीचा योग्य वापर होण्यासाठी आपण शिक्षण घ्यायला हवं. माणसाने आपल्या बुद्धीच्या जोरावर वाफेची इंजिन, चाक, वीज असे अद्भुत वाटावेत असे अनेक शोध लावून जग अधिक सुंदर बनवले आहे. जिज्ञासेला शोधाची, विज्ञानाला तंत्रज्ञानाला जोड देवून समाजाला एका उन्नत स्थितीला घेवून जावू शकतो. आपले चांगले संशोधन समाजाच्या उन्नतीला मदत करणारे ठरेल असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष, महविद्यालयाचे प्र. प्राचार्य, डॉ. डी. आर. भोसले त्यांनी व्यक्त केले. 

  ह्या व्याख्यानास महाविद्यालयाच्या आयक्युएसी प्रमुख डॉ. यु. एस. शेळके, विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या, प्रो. डॉ. पी. बी. पिस्टे, वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या, डॉ. एम. बी. देसाई, कला विभागाचे उपप्राचार्य, डॉ. ए. पी. उबाळे, महाविद्यालयातील विविध विषयाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्या व्याख्यानाचे प्रास्ताविक संशोधन कमिटीचे प्रमुख डॉ. के. व्ही. गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. श्यामल हुंबरे यांनी केले. आभारप्रदर्शन डॉ. अर्चना पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *