संस्कार भारती मिरज महानगर समिती आयोजित ” यादे आर.डी.” कार्यक्रमास रसिकांचा प्रतिसाद
प्रदीर्घ काळानंतर बालगंधर्व नाट्यगृहावर झळकला “हाऊसफुल्ल” चा बोर्ड
मिरज (प्रतिनिधी)
संस्कार भारती मिरज महानगर समितीच्या वतीने नवीन संवत्सराचे स्वागत आणि गतसंवत्सराला निरोप देण्यासाठी रजनीगंधा – यादें आर. डी. बर्मन हा श्रवणीय गीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सादर करण्यात आला. प्रसिद्ध संगीतकार राहुल देव बर्मन यांच्या गाण्यांना वाहिलेल्या या कार्यक्रमाला मिरजकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बालगंधर्व नाट्यगृहात “हाऊसफुल्ल”चा बोर्ड झळकला.
उद्घाटनप्रसंगी मिरज सराफ असोसिएशनचे अध्यक्ष राघवेंद्र (अण्णा) चिपलकट्टी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दीपप्रज्वलन व नटराज पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तसेच राजश्री शिखरे यांचा महिला उद्योजकता पुरस्काराबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात “चांद मेरा दिल”, “गुलाबी आंखें”, “रैना बीत जाये” यांसारखी लोकप्रिय गाणी गायक-गायिकांनी सादर केली. उत्कृष्ट सादरीकरणामुळे प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांकडून ‘वन्स मोअर’ची दाद मिळाली. वादकांची साथ आणि हर्षा बागल यांचे नेमके सूत्रसंचालन यामुळे कार्यक्रम अधिक रंगला.
नाट्यगृहात वातानुकूलन व्यवस्था नसतानाही प्रेक्षक शेवटपर्यंत ठामपणे उपस्थित राहिले. कार्यक्रमानंतर सर्वांनी समाधान व्यक्त केले. यावेळी नगरसेवक मोहन वाटवे यांनी सहा महिन्यांत नाट्यगृहातील वातानुकूलन व्यवस्था अद्ययावत करण्याचे आश्वासन दिले.


