माणसाला माणसाशी जोडण्याचे कार्य बसवेश्वरांनी केले – कॉ.धनाजी गुरव

0
WhatsApp Image 2026-04-21 at 9.50.15 AM

मिरज (प्रतिनिधी)

माणसाला माणसाशी जोडण्याचे आणि केवळ समाजाशीच नव्हे तर संपूर्ण जगाशी नाते निर्माण करण्याचे कार्य महात्मा बसवेश्वरांनी केले, असे प्रतिपादन कॉ. धनाजी गुरव यांनी केले. ते विश्वास जनप्रबोधन व्याख्यानमालेत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री कृष्णा भंडारे होते.

कॉ. गुरव पुढे म्हणाले की, ज्या काळात स्त्रियांकडे भोगवस्तू म्हणून पाहिले जात होते, त्या १२व्या शतकात बसवेश्वरांनी स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान दिले. अनुभव मंडपामध्ये त्यांनी स्त्रियांना सुमारे ३३ टक्के प्रतिनिधित्व दिले. अक्कमादेवी यांच्यासारख्या स्त्रीला अध्यक्षपद देत महिलांना नेतृत्वाची संधी दिली, तर दासोह व्यवस्थेतील कोठार प्रमुखपद दानम्मादेवी यांच्याकडे सोपवले. जातिव्यवस्था मोडून काढत श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कार्यही त्यांनी केले. आजच्या काळात बसव वचनांचा गांभीर्याने अभ्यास करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सौ. वृषाली व्हरकल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी सांगली मिरज कुपवाड महापालिकेत स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल डॉ. पंकज म्हेत्रे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय फडतरे यांनी केले. यावेळी मिरज विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. बी. टी. कुरणे, डॉ. एम. जी. म्हेत्रे, ज्येष्ठ साहित्यिक भीमराव धुळूबुळू, मिरज माळी समाजाचे अध्यक्ष बाळासाहेब कौलापुरे, शिवाजी दुर्गाडे, माणिकताई वांडरे, प्रमिला म्हेत्रे, जयश्री माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *