‘म्युझिक हेरिटेज पार्क’ प्रभावी संकल्पना – आशिष शेलार

0
WhatsApp Image 2026-07-29 at 6.50.24 PM

मुंबईत बैठक; मिरज संगीत नगरी विकासाला पूर्ण पाठबळ
सांगली (प्रतिनिधी)
संगीतनगरी मिरजेच्या विकासासाठी ‘म्युझिक हेरिटेज पार्क’ निर्मितीची संकल्पना अत्यंत प्रभावी आहे. राज्याचा सांस्कृतिक विभाग या कामासाठी संपूर्ण सहकार्य करेल. या संकल्पनेवर आधारित आराखडा निर्मितीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी बैठक घेऊन पुढील कार्यवाहीबाबत धोरण ठरवावे. आमचे त्याला पूर्ण पाठबळ असेल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली.

मुंबईत मंत्रालयात सांस्कृतिक कार्य विभागात श्री. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी ही मूळ संकल्पना मांडली आहे. बैठकीत त्यांनी संगीतनगरी मिरज शहराचा इतिहास आणि संकल्पनेचे सादरीकरण केले. तंतुवाद्य निर्माते मोहसीन मिरजकर, अल्ताफ पिरजादे, फारूक सतारमेकर, नईम सतारमेकर, आयुब सतारमेकर, गुलाबराव पाटील ट्रस्टचे विश्वस्त विरेंद्र पाटील प्रत्यक्ष तर जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी सांगलीतून ऑनलाईन बैठकीस हजर होते.

श्री. शेलार म्हणाले, ‘‘मी मिरजेची तंतुवाद्य निर्मिती पाहिली आहे. संगीत नगरी म्हणून मिरज शहराचा विकास करण्याच्या संकल्पनेला राज्य शासन पूर्ण सहकार्य करेल. त्यासाठी आराखडा निर्मिती, जागेची उपलब्धता याबाबत पालकमंत्री निर्णय घेतील. मी त्यांच्याशी चर्चा केली आहे. विविध पातळीवर निधी उभा करता येईल. जिल्हाधिकऱ्यांनी लवकरच त्याबाबत बैठक आयोजित करून यासंबंधित सर्वांना विश्वासात घेऊन पुढील आराखडा तयार करावा.’’

सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी या संकल्पनेला बळ दिले. ते म्हणाल, ‘‘मिरजेची संगीत परंपरा प्रदीर्घ आहे. तिला पुढे नेणारा हा प्रस्ताव आहे. योग्य दिशा, धोरण, आराखडा झाल्यास त्याला निश्चितपणे मुर्त स्वरुप मिळेल.’’ या बैठकीनंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बैठक झाली. त्यांनी संकल्पना समजून घेतली. ‘अतिशय उत्तम’ प्रस्ताव आहे, सांगलीला आल्यानंतर या विषयावर प्राधान्याने बैठक घेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

डिजीटल प्रेझेंटेशन
पृथ्वीराज पाटील यांनी डिजीटल प्रेझेंटेशन केले. ते म्हणाले, ‘‘मिरजेच्या तंतुवाद्य निर्मितीला २०० वर्षांची परंपरा आहे. जगभरातील तेरा देशांमध्ये ही वाद्ये निर्यात होतात. अनेक कुटुंबांचा तो व्यवसाय आहेच, शिवाय ती मिरजेची ओळख आहे. त्याला व्यापक स्वरुप दिल्यास उद्योग निर्मिती होईल, मिरजेचे पर्यटन वाढेल, निर्यातीला चालना मिळेल आणि नवीन कलाकार घडवून लोप पावत चाललेली कला पुन्हा भक्कपणे पुढे नेता येईल.’’

  • म्युझिक हेरिटेज पार्क म्हणजे काय ?
  • वाद्याचे संग्रहालय – पारंपारिक वाद्ये, जगभरातील विविध वाद्यांचा समावेश
  • साऊंड एक्सपिरियन्स डोम – संगीताची वेगळी अनुभुती देणारे केंद्र
  • संगीत कार्यशाळा आणि प्रशिक्षण केंद्र – स्वतंत्र अभ्यासमातून नवे कलाकार घडवणे
  • तंतूवाद्य निर्मिती केंद्र – परंपरागत कलाकारांना हक्काची जागा व बाजारपेठ मिळणार
  • वाद्य विक्री आणि फॅसिलिटेशन सेंटर – जगभरातील निर्यातील चालना देण्याचा प्रयत्न
  • ब्रँडिंग व संगीत महोत्सव – संगीतनगरीत संगीत पर्यटकांची संख्या वाढवणारे उपक्रम
  • कलाकार व पर्यटकांसाठी निवासी सुविधा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *