आई हीच पहिली गुरू; गुरु-शिष्य परंपरेचे मूल्य जपणे काळाची गरज – अशोक काळे

0
IMG-20260729-WA0016

मिरजेत गुरुपौर्णिमेनिमित्त कन्या महाविद्यालय येथे ‘गुरु-शिष्य परंपरा’ विषयावर व्याख्यान
मिरज (प्रतिनिधी)
दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटी संचालित कन्या महाविद्यालय, मिरज येथील ‘IQAC’ अंतर्गत गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून “गुरु-शिष्य परंपरा : काल, आज आणि उद्या” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रा. सौ. नलिनी प्रज्ञासूर्य (पर्यवेक्षिका, कनिष्ठ विभाग) यांच्या स्वागत व प्रास्ताविकाने झाली. यानंतर प्रा. डॉ. अनुराधा गोरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व सत्कार समारंभ पार पडला. या प्रसंगी संस्थेचे सचिव राजू झाडबुके आणि उपप्राचार्या डॉ. सुनीता माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अशोक अरविंद काळे (माजी प्राचार्य, बी. पी. एड. कॉलेज, मिरज) यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात गुरु-शिष्य परंपरेच्या विविध पैलूंवर सखोल प्रकाश टाकला. त्यांनी व्यास मुनींचे उदाहरण देत ‘व्यासपीठ’ या संकल्पनेचा अर्थ उलगडून दाखवला. प्राचीन काळातील गुरुकुल व्यवस्था आणि शिक्षण पद्धती स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, आई हीच पहिली गुरू असते. त्यांनी अभिमन्यू, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माता यांची उदाहरणे दिली.

​तसेच भीमसेन जोशी-सवाई गंधर्व आणि हरिप्रसाद चौरसिया-पन्नालाल घोष यांच्या प्रसंगांतून शिष्याची पात्रता व निष्ठा कशी असावी हे स्पष्ट केले. “झाकल्या ताटासारखे जीवन जगू नका” असा महत्त्वपूर्ण संदेश देत त्यांनी प्रेरणा, शाबासकी आणि शिक्षेचे महत्त्व पटवून दिले. इराण-युक्रेन युद्धाचा संदर्भ देत त्यांनी नियत, नीतिमत्ता आणि चांगल्या वागणुकीतूनच राष्ट्राचे कल्याण होईल असा विचार मांडला आणि प्रत्येकाने आपल्यातील कलेला गुरू मानून तिला समृद्ध करावे, असे आवाहन केले.

अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. उल्हास माळकर यांनी विद्यार्थी वर्गाने निरंतर साधना करावी यावर भर दिला. यासाठी त्यांनी श्रीकृष्ण-सुदामा आणि स्वामी विवेकानंद-रामकृष्ण परमहंस यांच्यातील अढळ नात्याची उदाहरणे दिली. ​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मधुरा जाधव तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. गंगाधर चव्हाण (सांस्कृतिक विभाग प्रमुख, वरिष्ठ विभाग) यांनी मानले. हा कार्यक्रम सांस्कृतिक विभागाच्या वतीने यशस्वीपणे पार पडला. याप्रसंगी महाविद्यालय चे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *