खोट्या जातीच्या दाखल्याप्रकरणी भाजपच्या जिल्हा परिषद सदस्येविरोधात ३ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

0
WhatsApp Image 2026-07-29 at 9.14.13 PM

मिरज (प्रतिनिधी)
मालगाव जिल्हा परिषद गटातील भाजपच्या सदस्या दिपाली श्रीकांत कांबळे (दिपाली सदाशिव सपकाळ) यांनी निवडणुकीसाठी खोटी कागदपत्रे सादर करून जातीचा दाखला मिळविल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी त्यांच्याविरोधात जत येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी २ मार्च ते १० जुलै २०२६ दरम्यान पूर्ण झाली असली, तरी अंतिम अहवाल अद्याप जिल्हाधिकारी व जिल्हा जात पडताळणी समितीकडे सादर करण्यात आलेला नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला. या विलंबाच्या निषेधार्थ ३ ऑगस्टपासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

मिरज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत तक्रारदार मनोहर अण्णाप्पा होनमोरे, कपिल सदानंद कबाडगे, नेमिनाथ श्रीमंत शेडबाळे, तुषार बाळासाहेब खांडेकर आणि प्रकाश राजाराम पोळ यांनी ही माहिती दिली. निवेदनावर रवींद्र दादासो हुळळे यांची स्वाक्षरी असून, यावेळी प्रदीप सावंत उपस्थित होते.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, उपविभागीय अधिकाऱ्यांनी कोसारी येथील मंडळ अधिकाऱ्यांकडून चौकशी करून घेतली होती. ८ मे रोजी सादर झालेल्या अहवालात जातीच्या दाखल्यासाठी अन्य कुटुंबाचा महसुली पुरावा जोडल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर सुनावणीसाठी सहा तारखा देण्यात आल्या; मात्र दिपाली कांबळे एकाही सुनावणीस हजर राहिल्या नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

१० जुलै रोजी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांत अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप अहवाल सादर झालेला नसल्याने राजकीय दबावामुळे कारवाई लांबविली जात असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला. तसेच भाजप सदस्यांविरुद्धच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असून सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *