नवयुवकांना सेवा दलात सहभागी करून काँग्रेस भक्कम करा : विक्रमदादा सावंत

0
WhatsApp Image 2026-05-07 at 5.17.43 PM

काँग्रेस सेवा दलाचे संस्थापक डॉ. नारायण हर्डीकर यांच्या जयंती उत्साहात

सांगली (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)

काँग्रेस सेवा दलाचे संस्थापक डॉ. नारायण सुब्बाराव हर्डीकर यांच्या जयंतीनिमित्त आज सांगली येथील काँग्रेस भवनात अभिवादन कार्यक्रम झाला. यावेळी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार विक्रमदादा सावंत आणि जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ. मालनताई मोहिते यांच्या हस्ते डॉ. हर्डीकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी बोलताना विक्रमदादा सावंत म्हणाले, काँग्रेस सेवा दल ही संघटना काँग्रेसचा मूळ पाया असून नवयुवकांना संघटनेत सहभागी करून प्रत्येक बूथवर संघटना मजबूत केली पाहिजे. काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष असून सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या मार्गाने कार्य करत महात्मा गांधी आणि डॉ. हर्डीकर यांच्या स्वप्नातील भारत उभारण्यासाठी युवकांची साथ आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

सौ. मालनताई मोहिते यांनी सेवा दलातील अनुशासन, त्याग आणि बलिदान या मूल्यांचा उल्लेख करत महिला विभाग अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली. प्रदेश सेवा दलाचे पैगंबर शेख यांनी काँग्रेस सेवा दल मजबूत झाल्यास काँग्रेस आणि पर्यायाने देशही मजबूत होईल, असे मत व्यक्त केले.

जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी डॉ. हर्डीकर यांच्या कार्याचा आढावा घेताना काँग्रेस अधिवेशन, ध्वजवंदन पद्धती, मिठाचा सत्याग्रह आणि भारत जोडो आंदोलनातील सेवा दलाच्या योगदानाची माहिती दिली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अरुण पळसुले यांनी केले, तर आभार विश्वास यादव यांनी मानले. यावेळी राजेश नाईक, रवींद्र कोलप, प्रमोद इनामदार, राजश्री नलगे पाटील, प्रतीक्षा काळे, प्रमिला महाडिक, अजित करांडे, बाळासाहेब पाटील, किसन गायकवाड, सुशांत जाधव, राजेंद्र सावंत, पांडुरंग कदम, नामदेव पठाडे, विठ्ठलराव काळे, शिवाजी सावंत, मीना शिंदे, शमशाद नायकवाडी, जन्नत नाईकवडी, सुरेश गायकवाड, गणेश वाघमारे, शिवाजी माळी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *