आर्थिक फसवणुकीपासून सावध राहा – दीपक क्षीरसागर
कुमठे येथे आर्थिक साक्षरता मेळावा उत्साहात
सांगली (प्रतिनिधी)
आजच्या घडीला आर्थिक साक्षर असणे खूप आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हेगारी वाढली आहे. आर्थिक फसवणूक टाळायची असेल तर दक्षता हा उत्तम उपाय असल्याचे सांगलीतील बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक साक्षरता केंद्रातील मार्गदर्शक दीपक क्षीरसागर म्हणाले. कुमठे (ता. तासगाव) येथील ग्रामपंचायत कार्यालयातील संजयकाका पाटील सभागृहात क्रिसिल फाऊंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ व आर्थिक साक्षरता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दीपक क्षीरसागर पुढे म्हणाले की, मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी लिंक किंवा ॲप्स डाउनलोड केल्याने बँक खात्यातील रक्कम परस्पर काढली जाऊन आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून कोणतीही संशयास्पद लिंक उघडू नये. लिज्जत पापड उद्योगाची यशोगाथा त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केली. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना, सुकन्या समृद्धी योजना, जनधन योजना तसेच आरसेटी (RSETI) मिरजच्या प्रशिक्षण उपक्रमांची त्यांनी सविस्तर माहिती दिली.
पीएमएफएमई योजना, आर्थिक विकास महामंडळांच्या योजना, ई-केवायसी प्रक्रियेचे महत्त्व, सुरक्षित बँकिंग व्यवहार व आर्थिक नियोजन याविषयी मार्गदर्शन कार्यक्रमाचे नियोजन करणाऱ्या एरिया मॅनेजर सौ. सुप्रिया पाशिलकर यांनी केले. तासगाव पंचायत समितीच्या सभापती सौ. अरुणा पाटील यांनीही महिला भगिनींना व्यवसाय संधी आणि त्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच सौ. शिलाताई गाडे, हेमलता धुमाळ, सोनाली पाटील, सुभाष पोवार, भक्ती सावी, नितीन शिंदे, नवनाथ जाधव व अन्य मान्यवर उपस्थित होते.


