मिरजेत पूर्ववैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने सपासप वार, प्रकृती गंभीर

0
WhatsApp Image 2026-06-02 at 9.18.20 PM

मिरज (प्रतिनिधी)
मिरज येथे पूर्ववैमनस्यातून तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. प्रदीप उर्फ शिव अथणीकर (वय २८, रा. सावंत प्लॉट, मिरज) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर तलवार व कोयत्याने सपासप वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या अथणीकर यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अथणीकर हे मित्रांसोबत जेवण करून दुचाकीवरून घरी परतत असताना मिरज-टाकळी रोडवरील चांद फ्रूटजवळ स्विफ्ट कारमधून आलेल्या पाच ते सहा हल्लेखोरांनी त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

घटनास्थळी तुटलेली तलवार व वाहनाची नंबर प्लेट आढळून आली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी पोलिसांना पुढील तपासाबाबत सूचना दिल्या. पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे जप्त केले असून पोलीस पथके संशयितांचा शोध घेत आहेत. घटनेनंतर टाकळी रोड आणि सिव्हिल हॉस्पिटल परिसरात गर्दी झाली होती. जखमी झालेल्या शिव अथणीकर याच्याविरुद्धही पोलिसात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा मिरज शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *