डॉ. रविकांत पाटील हे रुग्णांच्या हृदयातील स्पंदन- ईश्वर रायण्णावर
सेवासदन फाऊंडेशनचा स्नेहमेळावा व वार्षिक अहवाल प्रकाशन सोहळा उत्साहात
मिरज (प्रतिनिधी)
डॉ. रविकांत पाटील केवळ निष्णात हृदयरोगतज्ज्ञ नव्हेत, तर रुग्णांच्या वेदना समजून घेऊन त्यांना नवजीवन देणारे संवेदनशील वैद्य आहेत. त्यांनी रुग्णाच्या हृदयात हात घातला आहे. त्यामुळे ते हृदयातील स्पंदन बनलेत. त्यावर विशेष म्हणजे उत्तम सामाजिक कार्य करीत सेवासदन फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्याचे क्षितीज विस्तारले असल्याचे ईश्वर रायण्णावर म्हणाले. सेवासदन फाऊंडेशनच्या स्नेहमेळावा व वार्षिक अहवाल प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.
मिरजेत सेवासदन हॉस्पिटल येथे सेवासदन कम्युनिटी डेव्हलपमेंट फाउंडेशनचा १२ वा वर्धापन दिन तसेच सन २०२५-२६ च्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन पार पडले. कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध गावांमधून सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे सचिव योगेश पाटील, उपाध्यक्षा डॉ. अमृता दाते, डॉ. साक्षी पाटील, सौरभ पाटील तसेच संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य ही यावेळी उपस्थित होते.
ईश्वर रायण्णावर यांनी ‘सेवा’ या विषयाचे महत्त्व अधोरेखित करताना स्वतःपासून सुरू होणारी सेवा ही कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी कशी कारणीभूत ठरते याचे प्रभावी विवेचन केले. “देश हमें देता है सब कुछ, हम भी कुछ देना सीखें” या प्रेरणादायी विचाराभोवती त्यांनी आपले मनोगत मांडत उपस्थितांना सामाजिक कार्यासाठी प्रेरित केले. समाजासाठी निःस्वार्थ भावनेने काम करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित करीत डॉ. रविकांत पाटील यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रार्थनेने झाली. अध्यक्ष डॉ. रविकांत पाटील यांनी प्रास्ताविक करताना संस्थेच्या गेल्या बारा वर्षांच्या सामाजिक प्रवासाचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी गावोगावी जाऊन केलेल्या जनसंपर्काची, समाजातील विविध घटकांशी निर्माण झालेल्या विश्वासाची तसेच शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि सामाजिक विकास क्षेत्रातील विविध उपक्रमांची त्यांनी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन २०२५-२६ या वर्षाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. वार्षिक अहवालाचे वाचन डॉ. पद्मश्री चौगुले यांनी केले. सूत्रसंचालन सेवासदन कम्युनिटी डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या मीनाक्षी कोळी यांनी तर आभार गोविंद जोशी यांनी मानले


