अखंड शिवज्योतीच्या पाचव्या वर्षपूर्ती निमित्त राज्याभिषेकदिनी सांगलीत भव्य सांस्कृतिक कार्यक्रम
शिवसिंहव्दाराच्या भव्य देखाव्यासह सांगलीकरांना ‘अभंग रिपोस्ट’ची मेजवाणी
सांगली (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५३ वा राज्याभिषेक सोहळा आणि येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर प्रज्वलीत करण्यात आलेल्या ज्योतीच्या पाचव्या वर्षपुर्तीनिमित्त सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि येथील गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टने आयोजन केले आहे. शनिवारी (ता. ६) सायंकाळी सहापासून मारुती चौकात हा सोहळा रंगणार आहे.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे आणि गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी याबाबत माहिती दिली. या सोहळ्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे, तो ‘अभंग रिपोस्ट’ कार्यक्रम. संतांच्या अभंगांना आधुनिक संगीतात गुंफणारा हा कार्यक्रम नव्या पिढीच्या पसंतीला उतरणार आहे. सहा जणांची टीम त्याचे सादरीकरण करणार आहे. त्याचवेळी शिवसिंहव्दाराच भव्य देखावा उभारला जात आहे. येथे नयनरम्य आषतबाजी, लेझर शो, डीजे साऊंड असणार आहे. ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे हे प्रमुख पाहुणे व सांस्कृतिक कार्यमंत्री ना.आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा रंगणार आहे.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘‘गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त विरेंद्रसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून पाच वर्षांपूर्वी येथे शिवज्योत प्रज्वलीत करण्यात आली. ती अखंडपणे सुरु आहे. हा आमच्यासाठी गौरवाचा, अभिमानाचा क्षण आहे. शिवरायांच्या राज्याभिषेक दिनाचा हा सोहळा अधिक संस्मरणिय करणारे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम यानिमित्ताने सांगलीकरांसाठी आयोजित केले आहे. सर्वांना प्रवेश खुला आहे. महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आहे.’’


