सांगलीत ८ ते १४ जूनदरम्यान विश्वशांती नवचंडी महायज्ञ; केदारनाथ जगद्गुरूंसह विविध शिवाचार्य स्वामींची उपस्थिती
मिरज (प्रतिनिधी)
अधिक मास पुण्यपर्वामध्ये सांगली येथे विश्वशांती नवचंडी महायज्ञ, शिवकथा व केदारनाथ जगद्गुरूंचे आशीर्वचन, तसेच अड्ड पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉ. रविकांत पाटील यांनी दिली. मिरज येथे बेळंकी येथील शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी स्वागतअध्यक्ष डॉ. रविकांत पाटील, अध्यक्ष रवींद्र बुकटे, बाबासाहेब आळतेकर, राजकुमार साळवे, सुरेंद्र बोळाज, ईश्वर जनवाडे, केमिस्ट असोसिएशनचे माजी जिल्हाध्यक्ष विशाल दुर्गाडे, अरुण कोरे, योगेश पाटील आदी उपस्थितीत होते.
या कार्यक्रमास जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी (ओखीमठ उत्तराखंड) यांच्यासह कणपुप्पा येथील शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी, बेळंकी येथील शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी, म्हैसाळ येथील डॉ. शिवयोगी शिवाचार्य स्वामीजी, गुड्डापूर येथील गुरुपाद शिवाचार्य स्वामीजी, वाळवा येथील शिवानंद शिवाचार्य स्वामीजी व कोळे येथील कोळेकर मठाचे कोळेकर स्वामीजी उपस्थित राहणार आहेत. सोमवार दिनांक ८ जून ते रविवार दिनांक १४ जून पर्यंत हा सोहळा सांगली येथील तरुण भारत स्टेडियम मध्ये होणार आहे.
सांगली जिल्हा वीरशैव लिंगायत समाज व शिवबसव सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ सांगली यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यामध्ये शिवमहापुराण कथाकार समाधानजी महाराज शर्मा यांचे शिव महापुराण कथा होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ८ ते १४ जून दरम्यान येथे एमएसआय ब्लड सेंटर यांच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. येथे आयोजित या धार्मिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


