शिवाजी हायस्कूलमध्ये रंगला चिखलोत्सव
धामोड (प्रतिनिधी) राधानगरी तालुक्यातील क॥ तारळे येथील श्री शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स या प्रशाळेमध्ये चिखलोत्सव उत्साहात संपन्न झाला. ज्या मातीमध्ये आपण जन्मलो त्या माती विषयी विद्यार्थ्यांमध्ये प्रेम निर्माण व्हावे, मातीशी आपले नाते जोडले जावे, मातीशी ऋणानुबंध निर्माण होवून ते वृद्धिगंत व्हावेत या उदात्त हेतूने हा चिखलोत्सव घेण्यात आला.
एरवी पायाला जरा जरी चिखल लागला तरी विद्यार्थी संकोच करतात पण या चिखल महोत्सवात मनसोक्त लोळण्याचा व बागडण्याचा आनंद काही निराळाच असतो हे या उपक्रमातून दिसून आले. चिखलात जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेण्यात आली. या चिखल महोत्सवामध्ये विद्यार्थी धो-धो पावसामध्ये फुटबॉल, कबड्डी, खो-खो, रस्सीखेच, रॅली लगोरी, लंगडी, घसरगुंडी असे अनेक देशी – विदेशी खेळ खेळले तसेच विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर ठेका धरल्यामुळे चिखलोत्सवामध्ये रंगत आली. शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या सुमारे २५० विद्यार्थ्यांनी या चिखलोत्सवामध्ये सहभाग घेतला होता. या चिखलोत्सवाचे नियोजन प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. डी. कांबळे, पर्यवेक्षक एस. व्ही. कांबळे, बी. पी. शितोळे, एस. आर. सिद , व्ही. बी. कोळी यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
विद्यार्थ्यांना मैदानात उतरण्याआधी काय काळजी घेतली जाते?
कडुनिंबाचा पाला पाण्यात उकळून त्याचा अर्क आणि गोमूत्र पाण्यात (१:१:१० या प्रमाणात) मिक्स करून मैदानावर फवारणी केली. त्यामुळे कडुनिंबामध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात, तर गोमूत्र उत्तम जंतुनाशक म्हणून काम करते. शेतीसाठी वापरला जाणारा कळीचा चुना आणि हळद एकत्र करून चिखलावर आणि मैदानाच्या कडांवर पसरवण्यात आला. त्यामुळे चुना चिखलातील ओलसरपणा नियंत्रित करतो आणि जंतूंचा नाश करतो. हळद ही नैसर्गिक प्रतिजैविक असल्याने संसर्ग पसरू देत नाही.



