सांगरूळ हायस्कूलमध्ये अत्याधुनिक ओपन जिमचे लोकार्पण

0
सांगरूळ हायस्कूलमध्ये अत्याधुनिक ओपन जिमचे लोकार्पण

निरोगी जीवनशैली व क्रीडा संस्कृतीला मिळणार बळ

सांगरूळ  (प्रतिनिधी) : “ग्रामीण भागातील विद्यार्थी व नागरिकांना शहरांतील विद्यार्थी व नागरिक यांच्याप्रमाणे आधुनिक क्रीडा सुविधा मिळवून शारीरिकदृष्ट्या सक्षम व्हावे, नियमित व्यायामाची सवय लावावी आणि निरोगी जीवनशैली स्वीकारावी, यासाठी शासन कटिबद्ध आहे. सांगरूळ हायस्कूलमध्ये उभारण्यात आलेली अत्याधुनिक ओपन जिम या उद्दिष्टाला निश्चितच बळ देणारी ठरेल,” असे प्रतिपादन आमदार जयंत आसगावकर यांनी केले.

     महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या व्यायामशाळा विकास अनुदान योजना (सर्वसाधारण) २०२५-२६ अंतर्गत ₹७ लाख खर्चातून सांगरूळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे अत्याधुनिक ओपन जिम उभारण्यात आली. या आधुनिक व्यायामशाळेचे लोकार्पण आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते व सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष य. ल. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. श्रीफळ वाढवून व व्यायाम साहित्याचे पूजन केल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध व्यायाम उपकरणांचे अनावरण करण्यात आले.

        यावेळी बोलताना आमदार आसगावकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व अधोरेखित केले. नियमित व्यायामामुळे निरोगी समाज घडतो आणि ग्रामीण भागातही अशा सुविधा निर्माण करून क्रीडा संस्कृतीला चालना देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अशा विकासकामांसाठी आपण भविष्यातही सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

     या प्रसंगी संस्थेचे खजिनदार डी. जी. खाडे, संचालक आ. गो. कासोटे, बी. आर. नाळे, सदाशिव खाडे, गणपती नाळे, प्राचार्य एस. एम. नाळे, उपप्राचार्य एस. एस. मोरे, पर्यवेक्षक एस. व्ही. कुंभार,  बी. पी. खाडे, बी. आर. कांबळे,   पी. डी. खाडे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ  उपस्थित होते.

      सांगरूळ परिसरातील शाळेमध्ये उभारण्यात आलेली ही अशा प्रकारची पहिलीच ओपन जिम असून तिचा लाभ विद्यार्थी, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही होणार आहे. ग्रामदैवत श्री जोतिबा देवालयाच्या पायथ्याशी, निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या विद्यालय परिसरातील स्वच्छ हवा, प्रशस्त क्रीडांगण आणि शांत परिसरामुळे व्यायामासाठी पोषक वातावरण उपलब्ध झाले आहे. त्यामुळे परिसरात आरोग्याविषयी जनजागृती होण्यास आणि नियमित व्यायामाची सवय वाढीस लागण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लुकेश कोळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *