मिरज-पंढरपूर रोड वारकरी भवन परिसरातील स्ट्रीट लाईटवर वेलींचे साम्राज्य ; वारकऱ्यांची गैरसोय
मिरज (प्रतिनिधी)
मिरज–पंढरपूर मार्गावरील वारकरी भवन परिसरातील महापालिकेच्या स्ट्रीट लाईटच्या खांबांवर मोठ्या प्रमाणात वेलींचा विळखा पडला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रकाश व्यवस्थित पडत नसल्याने वारकरी बांधवांसह नागरिकांना रात्रीच्या वेळी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पावसाळ्यात वाढलेल्या वेलींच्या जाळ्यामुळे स्ट्रीट लाईट झाकल्या गेल्या असून, संपूर्ण परिसर अंधारमय होत आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने वारकरी, भाविक व नागरिकांची ये-जा असते. अपुऱ्या प्रकाशामुळे अपघाताचा धोका वाढण्याबरोबरच सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा याकडे लक्ष वेधले असतानाही संबंधित यंत्रणेकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे महापालिकेने तातडीने वेलींची छाटणी करून स्ट्रीट लाईट पूर्ववत कार्यान्वित कराव्यात, अशी मागणी वारकरी बांधव आणि परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.


