मिरज ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; अवैध वाळू व मुरूम वाहतूक करणारे दोन डंपर जप्त

0
WhatsApp Image 2026-07-03 at 9.30.48 PM

मिरज (प्रतिनिधी)

मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत बेकायदेशीररित्या वाळू व मुरूमाची वाहतूक करणारे दोन डंपर जप्त केले. या कारवाईत दोन चालकांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी जप्त वाहने महसूल विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहेत. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी ही माहिती दिली.

माहितीनुसार, रात्री ११.०० ते ३ जुलैच्या पहाटे ५.०० वाजेच्या दरम्यान मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी नियमित गस्त घालत होते. यावेळी हॉटेल मंत्रा परिसरात संशयास्पद वाहनांची तपासणी सुरू असताना दोन डंपर अडवून त्यांची चौकशी करण्यात आली. तपासणीदरम्यान (केए २३ बी ७२२२) या डंपरमधून कोणतीही वैध परवानगी नसताना वाळूची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी चालक जुबेर अश्पाक पटेल (वय ३०, रा. औरवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) याला ताब्यात घेण्यात आले.

तसेच (एमएच १० इक्यू १६२९) या डंपरमधून विनापरवाना मुरूमाची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी चालक युवराज शंकर यलपरटे (वय २९, रा. मालगाव, ता. मिरज, जि. सांगली) याच्यावरही कारवाई करण्यात आली. दोन्ही डंपर जप्त करून पंचनामा व सविस्तर अहवालासह पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी मिरज तहसीलदार यांच्या स्वाधीन करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास महसूल विभागाकडून सुरू आहे. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण यादव, भरत पवार, सचिन हाक्के, चालक मनोज जाधव, रामचंद्र शिंदे आणि प्रदीप कुंभार यांच्या पथकाने केली. मिरज ग्रामीण पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *